
गणेश थोरात, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 25 ऑक्टोबर 2023 : दादरमधील शिवाजीपार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडला. हा शिमगा मेळावा असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. तसंच मुंबईतील आझाद मैदानावर पार पडलेल्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावरही संजय राऊत यांनी टीका केली आहे. शिमगा हा हिंदू सण नाही का?, असा थेट सवाल संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
शिमगा हा हिंदूंचा सण नाही का? शिमगा हा महाराष्ट्रातील सण आहे. महाराष्ट्रातील उत्सवाचा मोठा भाग आहे. तुम्हाला नको हा उत्सव नको आहे का? होळी, दिवाळी सण नको आहेत का? नवीन सण संघ परिवाराने आणले आहेत आणि ते तुम्ही महाराष्ट्रात सुरू करणार आहात का? शिमगा हा आमच्या धर्मात राजकारणात एक महत्त्व आहे. आम्हाला तुमच्या नावाने शिमगा करावाच लागतो, असं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर पलटवार केला आहे.
2024 ला शिंदे गट सत्तेत नसणार. तुमच्या डोक्यात खाणेरडे किडे, भाजपने टाकले आहेत. कालचं अख्खं भाषण सर्व भाजप आणि नरेंद्र मोदी यांना मजबूत करण्यासाठी होतं. काल भाड्याचे लोक आले होते. हे लोक भाजपने पाठवले होते, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
आमच्यावर केली जाणारी टीका हा ठाकरे गटाचा जळफळाट आहे, अशी टीका शिंदेगटाकडून करण्यात येत आहे. त्याला राऊतांनी उत्तर दिलं. नक्कीच आमचा जळफळाट होत आहे. महाराष्ट्राचं नुकसान होत आहे. महाराष्ट्राची बदनामी केली जाते आहे. महाराष्ट्राच्या छाताडावर बेकायदेशीर सरकार बसून या मराठ्याची बदनामी केली जात आहे. त्यामुळे आमच्या मनामध्ये आग पेटलेली आहे. जळफळाट होत आहे, असं संजय राऊत म्हणालेत.
या देशांमध्ये गेल्या दहा वर्षापासून जातिवाद ,धर्मवाद ,क्षेत्र वाद याला खतपाणी घालून राजकारण केलं जातंय. त्यावर निवडणुका लढवल्या जात आहेत. हे काम कोण करतंय? तर ते भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व करत आहे. हे स्वतः हमास आहेत. त्यांच्या डोक्यात हमास आणि धमास भरलेला आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला आहे.