सुप्रिया सुळे महायुतीच्या मुख्यमंत्री झाल्यास शपथविधी सोहळ्याला जाणार, संजय राऊत यांचं सर्वात मोठं विधान
शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होण्याच्या चर्चांवर संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. सुप्रिया सुळे मुख्यमंत्री झाल्यास त्यांच्या शपथविधी सोहळ्याला आपण उपस्थित राहू, असं राऊत म्हणाले. त्यांनी भाजपच्या दिलदारीवर उपरोधिक टीका करत, उद्धव ठाकरेच अंतिम निर्णय घेतील असंही नमूद केलं.

शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या मुख्यमंत्री होणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. एनडीएत सामील होण्याच्या बदल्यात शरद पवार हे मुख्यमंत्रीपद मागणार असल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र, सुप्रिया सुळे यांनी या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत महत्त्वाचं आणि भुवया उंचावणारं विधान केलं आहे. सुप्रिया सुळे महायुतीच्या मुख्यमंत्री झाल्यास मी त्यांच्या शपथविधी सोहळ्याला जाईल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राऊत यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत विचारण्यात आलं. त्यावर संजय राऊत यांनी मिश्किल उत्तर दिलं. सुप्रिया सुळे यांची यावरची कालची प्रतिक्रिया मी पाहिली आहे. मी 12 वर्षापासून मंत्रीपदाची शपथ घेतच आहे, असं त्या म्हणाल्या आहेत. सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्रीपद मिळत असेल तर महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळेल. केवळ 10 आमदार असलेल्या पक्षाला भाजप मुख्यमंत्रीपद देऊ शकतं. इतकी दिलदारी भाजपकडे आहे, असा रेकॉर्ड सेट होईल. त्यांना मुख्यमंत्री होऊ द्या ना. त्यांनी शपथ घेतल्यावर आम्ही बोलू, असं मिश्किल विधान संजय राऊत यांनी केलं.
निर्णय उद्धव ठाकरेच घेतील
प्रतिभा पाटील यांना राष्ट्रपती पदासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला होता. तसाच पाठिंबा सुप्रिया सुळेंना देणार का? असा सवाल संजय राऊत यांना विचारण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यासाठी आम्हाला उद्धव ठाकरेंशी चर्चा करावी लागेल. उद्धव ठाकरेच निर्णय घेतील. मला व्यक्तिगत विचाराल तर सुप्रिया सुळे खरोखर मुख्यमंत्री होत असतील तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे. 10 आमदारांची ताकद असलेला पक्ष, त्यात तीन गट आहे. अशा पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळत असेल तर चांगलंच आहे, असा उपरोधिक टोलाही राऊत यांनी लगावला.
त्या आमच्या घरातील सदस्य
सुप्रिया सुळे आमच्या घरातील सदस्य आहेत. त्या मुख्यमंत्री होत असतील तर आम्हाला आनंदच आहे. त्यांना शपथ घेऊ द्या. 12 वर्षानंतर मुख्यमंत्र्यांची शपथ घेणार असतील तर आनंद आहे. त्यांनी शपथ घेतल्यावर मी त्यांचं स्वागत करेन. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला मी स्वत: हजर राहील, असं त्यांनी स्पष्ट केलं.
रोहित पवार महत्त्वाचे नेते
रोहित पवार राष्ट्रवादीत एकाकी पडल्याची चर्चा आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या पक्षातील धोरणात्मक निर्णयावर आम्ही कसं बोलणार? रोहित पवार अनेक प्रश्नावर आंदोलन करत असतात. संघर्ष करत असतात. जनता म्हणून म्हणाल तर रोहित पवार घेत असलेले प्रश्न महत्त्वाचे आहेत. रोहित पवार हे जनतेचं काम करत आहेत. विरोधी पक्षाचं काम करत आहेत. त्यांच्या पक्षात काय आहे हे मी सांगू शकत नाही. पण त्यांचे विषय जनहिताचे आहेत. रोहित पवार हे महत्त्वाचे नेते आहेत. पवार कुटुंबातील महत्त्वाचे सदस्य आहे. कुणी मुद्दाम करतंय यावर विश्वास नाही, असं त्यांनी म्हटलं.