“अखंड राष्ट्र करायचं तर स्वागत पण फाळणी करुन तुटलेल्या पाकिस्तानातील 11 कोटी मुसलमानांचे काय करणार? त्यावर मोदींनी बोलावं”

| Updated on: Aug 22, 2021 | 8:21 AM

पंतप्रधान मोदी यांना अखंड राष्ट्र करायचेच असेल तर स्वागतच आहे. पण फाळणी करून तुटलेल्या पाकिस्तानातील 11 कोटी मुसलमानांचे काय करणार? त्यावरही पंतप्रधान मोदींनी भाष्य करावं, असं आजच्या सामना रोखठोकमध्ये शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

अखंड राष्ट्र करायचं तर स्वागत पण फाळणी करुन तुटलेल्या पाकिस्तानातील 11 कोटी मुसलमानांचे काय करणार? त्यावर मोदींनी बोलावं
संजय राऊत आणि नरेंद्र मोदी
Follow us on

मुंबई : ‘फाळणीचा दिवस विसरू नका,’ असे पंतप्रधान मोदींचे फर्मान आहे. पण आज फाळणीच्या वेदना जागवून काय होणार? फाळणीची वेदना आता कशी शांत होणार?, पंतप्रधान मोदी यांना अखंड राष्ट्र करायचेच असेल तर स्वागतच आहे. पण फाळणी करून तुटलेल्या पाकिस्तानातील 11 कोटी मुसलमानांचे काय करणार? त्यावरही पंतप्रधान मोदींनी भाष्य करावं, असं आजच्या सामना रोखठोकमध्ये शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदी यांनी देशाला आणखी एक नवा कार्यक्रम दिला. 14 ऑगस्ट हा फाळणीचा स्मृती दिवस पाळायचा असे त्यांनी ठरवून टाकले. म्हणजे 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाचा आनंद सोहळा व 14 ऑगस्ट म्हणजे एक दिवस आधी फाळणीच्या दुःखद आठवणींना उजाळा देण्याचा दिवस. एका देशाचे अस्तित्व आणि अखंडत्व खतम होण्याची वेदना काय असते ते आज आपण अफगाणिस्तानात अनुभवत आहोत. अराजकाच्या नरकात तो संपूर्ण देश आक्रोश करतोय. देशाला नरकात ढकलून अफगाणिस्तानचे राज्यकर्ते पळून गेले आहेत.

स्वातंत्र्यलढ्यात अखंड हिंदुस्थानवाल्यांनी लढा दिलाच नाही!

आपल्याला स्वातंत्र्य मिळत असतानाही काय घडत होते? देशाची फाळणी होऊ नये व देश अखंड राहावा असे वाटणारी मंडळी त्यावेळी काय करीत होती? प्रा. नरहर कुरंदकर यांच्या शब्दांत सांगायचे तर, ”अखंड भारतवाल्यांनी लढाच दिला नाही. अखंड भारत टिकविण्याची लढाई देण्यापूर्वी ज्या मंडळींनी मुस्लिम लीगचा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मान्यच करुन टाकला त्याचे वर्णन कोणत्या शब्दांत करावे? अखंड हिंदुराष्ट्रवाल्यांनी नेमके हेच कार्य केले.

युद्धापूर्वीच ‘त्यांनी’ रणातून पळ काढला

अखंड हिंदुस्थानचा जयघोष करत या मंडळींनी द्विराष्ट्रवाद म्हणजेच ‘फाळणी’ मान्य केली आणि अखंड भारत टिकविण्यासाठी लढण्याऐवजी युद्धापूर्वीच रणातून पळ काढला. पराक्रमी जखमी वीराला तो पराभूत झाला म्हणून सज्जात बसून चकाट्या पिटणाऱ्यांनी हिणवावे अशातलाच हा प्रकार होता. म्हणजेच एरव्ही जे लढताना मेले आणि जे अंथरुणावर झोपी गेले त्या दोघांनाही सारखेच वंदनीय ठरविण्यात अर्थ नसतो!”

तर फाळणीचा स्मृतिदिन साजरा करण्याची वेळ 75 वर्षांनंतर आली नसती!

काही लोक गांधीहत्या करणाऱ्या पंडित गोडसेंच्या प्रतिमेची आजही पूजा करतात. त्यांच्या फाशी दिवसाचा सोहळा साजरा करतात. गोडसेंना श्रद्धांजली म्हणून गांधीच्या प्रतिमेवर गोळ्या झाडून पुनःपुन्हा गांधीहत्येचा आनंद साजरा करतात. फाळणी नको असे सांगणारे, लिहिणारे मूठभर लोक तेव्हाही अगदी याच पद्धतीने वागत व जगत होते. त्या काळात एखाद्या फाळणीविरोधी गोडसेने पाकिस्तानचा रेटा लावणाऱ्या जीनांवर पिस्तुल रिकामे केले असते तर फाळणीचा स्मृतिदिन साजरा करण्याची वेळ 75 वर्षांनंतर आली नसती.

गोडसेसारख्यांनी जीनांना संपवले असते तर देशाचे अखंडत्व नक्कीच टिकले असते!

गोडसेने निःशस्त्र गांधींना मारले. कारण त्यांच्या दृष्टीने फक्त तेच एकमेव फाळणीचे गुन्हेगार होते. मग जीना कोण होते? बॅ. जीनांनी फक्त एक टाईपरायटर, वकिली कौशल्यावर देशाची फाळणी घडवून पाकिस्तान मिळविला. गोडसेसारख्यांनी जीनांना संपवले असते तर देशाचे अखंडत्व नक्कीच टिकले असते.

फाळणी करून तुटलेल्या पाकिस्तानातील 11 कोटी मुसलमानांचे काय करणार?, मोदींनी सांगावं

‘फाळणीचा दिवस विसरू नका,’ असे पंतप्रधान मोदींचे फर्मान आहे. पण आज फाळणीच्या वेदना जागवून काय होणार? फाळणीची वेदना आता कशी शांत होणार? त्यावर उपाय एकच. फाळणी करून तोडलेली भूमी पुन्हा आपल्या देशात सामील केली जाईपर्यंत राष्ट्रभक्त जनतेच्या मनात शांतता लाभणार नाही आणि देशातही शांतता नांदणार नाही. प्रत्येक हिंदूंच्या मनात ही फाळणीची जखम, अंतःकरणाच्या खोल कप्प्यात सदैव ठसठसत आहे. भारत पूर्वीप्रमाणे अखंड व्हावा असे प्रत्येकाला वाटत असले तरी ते शक्य दिसत नाही, पण आशा अमर आहे. पंतप्रधान मोदी यांना अखंड राष्ट्र करायचेच असेल तर स्वागतच आहे. पण फाळणी करून तुटलेल्या पाकिस्तानातील 11 कोटी मुसलमानांचे काय करणार? त्यावरही त्यांनी भाष्य करावे.

(Sanjay Raut Slam PM Modi through Saamana Rokhthok Over partition horrors remembrance Day)

हे ही वाचा :