
“कोण काय बोलतायत याकडे लक्ष देण्याची गरज नाहीय. दिल्लीचे बूट चाटे लोक आहेत. दिल्लीच्या बूट चाट्यांनी त्यांचं राजकारण करावं. त्यांनी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करु नये. त्यांच्या पोटात भितीचा गोळा आला असेल, तो त्यांच्या तोंडातून बाहेर पडतोय” असं संजय राऊत म्हणाले. “मराठी माणूस एक आहे. मराठी माणसाचं नेतृत्व राजजी-उद्धवजी करतील. मुंबईसह ठाणे, कल्याण, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, पुणे, नाशिक या महापालिका एकत्र लढवणार आहोत. तिथे जागा वाटपाची चर्चा संपली आहे. याशिवाय इतर महापालिका जिथे शक्य आहे, तिथे एकत्र लढवण्यासंदर्भात काम करत आहोत” असं संजय राऊत म्हणाले.
“छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही मराठी माणसाने स्वराज्याला विरोध केला. पण तरीही छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली, त्यावेळी विरोध करणारे काही मराठी सुद्धा होते. पण बाळासाहेबांनी त्यावर मात करुन शिवसेना निर्माण केली” असं संजय राऊत म्हणाले. “दिल्लीच्या बूट चाट्यांनी बूट पॉलिशवाल्यांचा मेळावा घेतला. ते प्रॅक्टिस करतायत, दिल्लीचे बूट कसे चाटता येतील. रंगीत तालिम सुरु आहे. मध्यमवर्गीय, तळागाळातील मराठी माणूस ठामपणे शिवसेना-भाजपच्या युतीमागे उभा आहे. यात अजिबात शंका नाही” असं दावा संजय राऊत यांनी केला.
काही लोकांच्या मनात भितीचा गोळा आला
“काँग्रेसने आमच्यासोबत यावं अशी आमची भूमिका आहे. जयंत पाटील, शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी यात लक्ष घातलं आहे. युती किंवा आघाडीत प्रत्येकाच्या मनासारखं होत नाही. काही ठिकाणी त्याग करावा लागतो” असं संजय राऊत म्हणाले. बटोगे तो पिटोगे असा उत्तर भारतीयांना इशारा देणारा बॅनर लावला आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले की, “हे भाजप आणि शिंदेगटाचं काम आहे. हे हिंदी भाषिकांना अस्वस्थ करण्याचं काम आहे. त्यांना कोणी मारलेलं नाही. उत्तर भारतीय जे मुंबईचे नागरिक आहेत, उद्धव ठाकरेंनी मी मुंबईकरचा नारा दिलेला. आता मराठी माणसाच्या एकजुटीमुळे काही लोकांच्या मनात भितीचा गोळा आला आहे. ते दुहीचं राजकारण करतायत. शिवसेनेने विनाकारण कोणाला मारलेलं किवा हल्ला केलेला नाही”
यावर तुम्ही प्रश्न का विचारत नाही?
“कर्नाटकात सीमाभागात मराठी माणसावर हल्ले झाले आहेत. त्याचा साधा निषेध मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलाय का?. सीमाभागात मराठी माणसावर अन्याय होतोय. उत्तर प्रदेशात मराठी माणसावर हल्ले होत आहेत” असं संजय राऊत म्हणाले. शिवसेनेने विनाकारण मारलं नाही, पण मनसेसोबत तुम्ही आहात या प्रश्नावर राऊत म्हणाले की, “भाजपचे आमदार पराग शाह यांनी गरीब मराठी रिक्षावाल्याला मारलं, ते तुम्हाला दिसत नाही का? भाजपच्या आमदाराने मराठी माणसावर हात उचलला, यावर तुम्ही प्रश्न का विचारत नाही? गरीब मराठी रिक्षावाल्याला मारण्याचा अधिकार भाजपच्या आमदाराला कोणी दिला?” यावर बोला असं संजय राऊत म्हणाले.