‘नवा-जुना वाद नको’, शेकाप नेत्याच्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांचे कान टोचले

| Updated on: Feb 28, 2023 | 5:18 PM

भाजप (BJP) पक्ष महाराष्ट्रात आणखी बळकट होण्याच्या दिशेला आहे. कारण शेतकरी कामगार पक्षातील एका बड्या नेत्याचा आज पक्षप्रवेश झालाय. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांचे कान टोचले.

नवा-जुना वाद नको, शेकाप नेत्याच्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांचे कान टोचले
देवेंद्र फडणवीस
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : पेण मतदारसंघाचे माजी आमदार आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते धैर्यशील पाटील (Dhairyashil Patil) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत धैर्यशील पाटील यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. मुंबईत भाजपच्या पक्ष कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पक्षातील नेत्यांचे देखील कान टोचले. तसेच त्यांनी धैर्यशील पाटील यांना भाजप पक्षात योग्य संधी मिळेल, परक्यासारखी वागणूक मिळणार नाही, असं आश्वासन दिलं.

“सगळ्यांना संधी मिळेल. कोणाचाही संधी डावलली जाणार नाही. सर्वांना त्यांच्या ताकदीनुसार संधी मिळेल. कुठेही नवा किंवा जुना असा वाद उद्भवणार नाही. आपल्याला सगळ्यांना मिळून एका दिशेने पुढे जायचं आहे या दृष्टीने काम करु. धैर्यशील पाटील यांच्यासोबत आलेले सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचं मी मन:पूर्वक स्वागत करतो”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘एक कुटुंब म्हणून काम करायचंय’

“सामान्य वर्गाची चिंता करणारे, तुम्ही पक्ष बदलला तरी तुम्ही विचार बदलत नाही. कारण आम्हाला पण वंचित घटकांसाठी काम करायचं आहे. कुठल्याही परिस्थिती जे आले आहेत त्यांना परकं वाटणार नाही याची काळजी घेऊ, असं मी आश्वासन देतो. आपल्याला एक कुटुंब म्हणून काम करायचं आहे. नव्या जुन्याचा वाद करायचा नाही. एक नवा अध्याय आपण आजपासून सुरू केला आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“मला अतिशय आनंद आहे की आज धैर्यशील पाटील यांचा पक्ष प्रवेश झालाय. 2014 साली मी प्रयत्न केला होता. पण मला यश मिळालं नाही. त्यांनी सामान्य माणसाकरता काम केलं आहे. विरोधी पक्षात असताना ते आपले प्रश्न धडाडीने मांडायचे. मी मुख्यमंत्री असताना सुद्धा ते माझ्याकडे प्रश्न घेऊन यायचे आणि मी ते सोडवायचो. अशा कार्यकर्ताचं नेतृत्व आपल्याकडे असलं पाहिजे, असं मला वाटत होतं”, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं.

धैर्यशील पाटील काय म्हणाले?

यावेळी धैर्यशील पाटील यांनीदेखील आपलं मत मांडलं. “भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या ताकदीने आपण शेकापमध्ये काम केलं त्याच पद्धतीने आपण इथेही काम करू. शेकापमध्ये काही कमी मिळालं म्हणून नाही, तिथेही आम्हाला भरभरून मिळालं. काही कमी पडले म्हणून हा निर्णय घेतला नाही. तर कष्टकरींचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्यासाठी आणखी धार यावी, आणि राष्ट्रीय पातळीवर कष्टकऱ्यांचं म्हणणं मांडता यावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवत आहोत”, असं धैर्यशील पाटील म्हणाले.

“आपण कुठेही मागे पडू नये म्हणून आपल्याला भाजपमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. आपण निष्ठने काम करणारी माणसं आहोत. 90 टक्के आपल्याला यश मिळेल. तुमची जबाबदारी मी स्वीकारेन. तुमचं सामाजिक आणि राजकीय अस्तित्व टिकवण्याची जबाबदारी मी या पक्षातील नेत्यांकडून घेतली आहे”, असं ते आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले.