शिंदे गटाचे 13 खासदार पडणार, काळ्या दगडावरची रेघ आहे; संजय राऊत यांचा दावा

| Updated on: May 24, 2023 | 11:25 AM

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज मोठा दावा केला आहे. शिंदे गटाचे 13 खासदार पुन्हा निवडून येणार नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच शिवसेनेचे 19 खासदार संसदेत दिसतील, असंही ते म्हणाले आहेत.

शिंदे गटाचे 13 खासदार पडणार, काळ्या दगडावरची रेघ आहे; संजय राऊत यांचा दावा
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : शिंदे गटाकडे त्यांचे लोकसभेसाठी 13 उमेदवार तरी आहेत का? त्यांच्या त्या 13 पैकी एकही खासदार निवडून येणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. ते शिवसेनेकडून निवडून आले होते, असा दावा करतानाच 19 चे 19 खासदार आमच्याकडे आहेत. त्या सर्व जागांवर परत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत मीडियाशी बोलत होते.

लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचं मेरिटवर सिलेक्शन होणार आहे. त्यात दूमत नाही. आमचे लोकसभेत 19 खासदार होते. आम्ही 19 खासदार निवडून आणू. आमचे 19 खासदार लोकसभेत असतील, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

आम्ही केजरीवालांसोबत

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आज 12.30 वाजता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटायला येणार आहेत. आम्ही त्यांचं स्वागत करू. दिल्ली सरकारच्या विरोधात जो अध्यादेश केंद्र सरकारने काढला आहे, त्याविरोधात आम्ही राज्यसभेत एकजुटीने विरोध करू. त्याविरोधात आम्ही वातावरण तयार करत आहोत. आम्ही केजरीवालांसोबत आहोत, असं राऊत म्हणाले.

पवारांना पुरावे दाखवले

यावेळी त्यांनी अनिल देशमुख यांना कशापद्धतीने अडकवण्यात आलं होतं, यावरही भाष्य केलं. अनिल देशमुख खरं बोलत आहेत. त्यांना कोणत्या प्रकारचा दबाव आणि ऑफर होती, त्याचे पुरावे त्यांच्याकडे आहेत. काही व्हिडीओ क्लिप्स त्यांच्याकडे आहेत. कोण त्यांना भेटलं? कोणी त्यांना ऑफर्स दिल्या? कोण त्यांच्याशी काय बोललं? कोण त्यांच्या सह्या अॅफिडेव्हिटवर घेऊ इच्छित होतं? कुणाची नावं घ्या असा दबाव होता? ही सर्व माहिती माझ्याकडे होती आजही आहे. देशमुखांशी अनेकदा माझं बोलणं झालं होतं. आजही त्यांच्याकडे पुरावे आहेत. काही पुरावे त्यांनी शरद पवार यांनाही दाखवले होते. त्यांनी सर्व प्रस्ताव नाकारल्यावर त्यांच्यावर खोटे आरोप करून तुरुंगात टाकण्यात आलं, असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.