आता मंत्रालयात बिनधास्त या, करा ‘या’ गोष्टी, शासनाची खुली परवानगी

| Updated on: Feb 04, 2023 | 6:34 PM

सर्वसामान्य नागरिकांना दुपारी दोन नंतर प्रवेश असतानाही मंत्रालयात येणाऱ्यांची संख्या हजार, दोन हजार, पाच हजार अशी वाढतच होती. मात्र, ही वाढती संख्या अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत होती.

आता मंत्रालयात बिनधास्त या, करा या गोष्टी, शासनाची खुली परवानगी
CM EKNATH SHINDE IN MANTRALAY
Image Credit source: TV9 NETWORK
Follow us on

मुंबई : राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात सर्वसामान्य नागरिकांना दुपारी दोन नंतर प्रवेश देण्यात येतो. दोन वर्ष कोरोनामुळे मंत्रालयात येणारे नागरिक यांच्यावर निर्बंध घालण्यात आले होते. मंत्रालयीन कर्मचाऱ्यांनाही घरून काम करण्याची परवानगी देण्यात आली होती. कोरोनाचे निर्बध उठले आणि मंत्रालयातील वर्दळ वाढू लागली. राज्यात सत्ताबदल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. सर्वसामान्य नागरिकांना दुपारी दोन नंतर प्रवेश असतानाही मंत्रालयात येणाऱ्यांची संख्या हजार, दोन हजार, पाच हजार अशी वाढतच होती. मात्र, ही वाढती संख्या अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत होती. त्यावर सरकारने बऱ्यापैकी नियंत्रण आणले आहे.

एकीकडे सामान्यांची वर्दळ वाढत असताना दुसरीकडे मंत्रालयाच्या मुख्य इमारतीमधील तळ मजल्यावर असलेल्या त्रिमूर्ती प्रागंणात निरनिराळे कार्यक्रम, प्रदर्शन भरविण्यात येत होते. मराठी भाषा दिनानिमित्त पुस्तकांचे प्रदर्शन, दिवाळी निमित्त सामाजिक संस्थेमधील मुलांनी बनविलेल्या पणत्या, कंदील अशी वेगवेगळी प्रदर्शने भरविण्यात येत होती. या प्रदर्शनाला मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी आणि येणाऱ्या जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे शासनाने आता असे कार्यक्रम आणि प्रदर्शने भरविण्यास परवानगी देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

त्रिमूर्ती प्रांगणाच्या जागेचे आरक्षण सामान्य प्रशासन विभागाच्या (कार्या-२२) या कार्यासनाच्या नियंत्रणाखाली आहे. ही जागा आरक्षित करण्याचे प्रस्ताव या कार्यालयाकडे प्राप्त होत होते. असे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर आरक्षण उपलब्ध करून देताना काही अटी व शर्ती निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसर राज्यशासनाने आता त्रिमूर्ती प्रांगणाची जागा सार्वजनिक हिताच्या कार्यक्रमासाठी काही अटी आणि शर्तीनुसार उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

काय आहेत अटी आणि शर्ती

  • त्रिमूर्ती प्रांगणाच्या जागेचे आरक्षण करण्यासाठीचे प्रस्ताव त्या त्या प्रशासकीय विभागामार्फत सामान्य प्रशासन विभाग/कार्या-२२ यांच्याकडे सादर करावेत.
  • प्रशासकीय विभागांच्या अधिनस्त कार्यालयांनी थेट या कार्यासनाकडे पत्रव्यवहार करू नये.
  • त्रिमूर्ती प्रांगणाची जागा शासकीय कार्यालये व प्रशासकीय विभागाच्या संमतीने सामाजिक संस्था यांना प्रदर्शनासाठी अनुज्ञेय राहील.
    खाजगी संस्था, बँका यांना ही जागा प्रदर्शनासाठी वापरता येणार नाही.
  • मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव / विशेष कार्य अधिकारी, राज्य शासनाच्या मान्यताप्राप्त संघटना यांनी कायर्क्रम घेण्यापूर्वी तसा प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठवावा.प्रशासकीय विभागांनी त्यांच्या शिफारशीसह या कार्यासनाकडे प्रस्ताव सादर करावा.
  • कोवीड – १९ च्या राज्य व केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून आणि योग्य ते सामाजिक अंतर राखून कार्यक्रमाचे आयोजन करावे.
  • प्रदर्शन आयोजित करताना सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
  • शासनाची वेळ व कामात अडथळा येणार नाही याकडे लक्ष देवून प्रदर्शनाचे कार्यक्रम करावे.
  • ध्वनी प्रदूषण होणार नाही याची दक्षता घेतानाच ध्वनी क्षेपकाचा आवाज त्रिमूर्ती प्रांगणापुरता मर्यादित राहील याची दक्षता घेण्यात यावी.
  • प्रदर्शनावेळी लावण्यात आलेले बॅनर्स / पोस्टर्स कार्यक्रम संपल्यानंतर काढण्याची आणि प्रांगण स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी त्या त्या संस्था, विभागाची असेल.
  • पोलीस उपआयुक्त / सहायक पोलीस आयुक्त, मंत्रालय सुरक्षा (प्रवेशव्दार) यांनी कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांना विभागांच्या विनंतीनुसार प्रवेशपत्र द्यावे.
  • सुरक्षितेच्या दृष्टीने गृह विभागाची परवानगी घेणे आवश्यक असेल.
  • मुख्यमंत्री / उपमुख्यमंत्री / मंत्री / राज्यमंत्री यांना त्रिमूर्ती प्रांगणातील जागेची आवश्यकता भासल्यास विभागांना दिलेली परवानगी पूर्व सूचनेशिवाय रद्द करण्यात येईल. तसे झाल्यास पर्यायी जागेची व्यवस्था केली जाणार नाही.
  • कार्यक्रमावेळी भोजन,अल्पोपहार याची व्यवस्था करता येणार नाही.