Exclusive: प्रताप सरनाईक आणि संजय राऊत यांची ‘सामना’च्या कार्यालयात भेट; दीड तास गुप्त चर्चा

| Updated on: Nov 24, 2020 | 5:47 PM

शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक अखेर प्रसारमाध्यमांसमोर आले आहेत. | Pratap Sarnaik

Exclusive: प्रताप सरनाईक आणि संजय राऊत यांची सामनाच्या कार्यालयात भेट; दीड तास गुप्त चर्चा
Follow us on

मुंबई: सक्तवसुली संचलनालयाने (ED) कारवाईचा झटका दिल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक अखेर प्रसारमाध्यमांसमोर आले. त्यानंतर त्यांनी थेट ‘सामना’च्या कार्यालयात जाऊन शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. यावेळी संजय राऊत आणि प्रताप सरनाईक यांच्यात साधारण दीड तास चर्चा केली. (Pratap Sarnaik meet Sanjay Raut in Saamna office)

‘सामना’च्या कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रताप सरनाईक यांच्या चेहऱ्यावर प्रचंड तणाव दिसत होता.  या चर्चेत काय झालं हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. ‘ईडी’ने नक्की का कारवाई केली, माझ्या मुलाला का ताब्यात घेतले, याची माहिती मीदेखील अजून घेत असल्याची मोघम प्रतिक्रिया त्यांनी दिली.

संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर प्रताप सरनाईक पुन्हा कुठे रवाना झाले, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, त्यांच्यासोबत संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हेदेखील आहेत. त्यामुळे आता शिवसेनेच्या गोटातून प्रताप सरनाईक यांच्यासाठी मोर्चेबांधणी सुरु झाल्याची चिन्हे दिसत आहेत.

सरनाईक हे मुंबईतच होते?

‘टीव्ही 9 मराठी’ला मिळालेल्या माहितीनुसार प्रताप सरनाईक हे भारताबाहेर नव्हते. ते मुंबईतच होते. मात्र ते नेमके कुठे होते, हे माहीत नाही, असं सूत्रांनी सांगितलं. सर्व प्रकरणाचा अंदाज घेतल्यानंतर त्यांनी प्रभादेवी येथील ‘सामना’च्या कार्यालयात जाऊन शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेऊन दीड तास चर्चा केली. यावेळी काय चर्चा झाली याचा तपशील देण्यास त्यांनी नकार दिला.

आम्ही शहीद होऊ, पण गुडघे टेकणार नाही, शिवसेना सरनाईकांच्या पाठीशी : संजय राऊत

प्रताप सरनाईक ‘सामना’च्या कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्यासारख्या शिवसेनेच्या प्रवक्ते-नेते- आमदार-खासदारांनी पक्षाच्या भूमिका ठामपणे मांडल्या, त्यांच्याविरोधात दडपशाही सुरु आहे, ही झुंडशाही आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

हे फक्त राजकीय प्रकरण आहे. शिवसेनेचे प्रवक्ते प्रताप सरनाईक यांनी पक्षाच्या भूमिका ठामपणे मांडल्या. एका चॅनलविरोधात असो किंवा अन्वय नाईक प्रकरण असो, त्यामुळे काही जणांच्या पोटात ही मळमळ-जळजळ सुरु असावी. विरोधी पक्षाच्या आमदार-खासदारांची दडपशाही करण्याचा प्रयत्न असेल. पण आम्ही या महाष्ट्राची औलाद आहोत. आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत. आम्ही शहीद होऊ महाराष्ट्रासाठी, शिवसेनेसाठी, पण यांच्यासमोर गुडघे टेकणार नाही, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.

संबंधित बातम्या:

प्रताप सरनाईक काही साधू संत नाही, नारायण राणेंची ईडीच्या कारवाईवर प्रतिक्रिया

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर-कार्यालयावर ईडीचे छापे, सुपुत्र विहंग सरनाईक चौकशीसाठी ताब्यात

कोण आहेत प्रताप सरनाईक?

(Pratap Sarnaik meet Sanjay Raut in Saamna office)