शिवसेनेकडून राहुल गांधींना सावरकरांवरील पुस्तक भेट

| Updated on: Dec 16, 2019 | 7:24 PM

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधी यांना सावरकरांची पुस्तके वाचायला दिली पाहिजेत अशी सूचना केली होती. त्यानंतर आता शिवसैनिकांनीच राहुल गांधींना सावरकरांवरील पुस्तक भेट म्हणून दिल्लीला पाठवलं आहे.

शिवसेनेकडून राहुल गांधींना सावरकरांवरील पुस्तक भेट
Follow us on

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर आता शिवसैनिकांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना सावरकरांवरील एक पुस्तक भेट दिलं (Savarkar Book to Rahul Gandhi). राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्याचे पडसाद आता देशभरात उमटत आहेत. राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे (Rahul Gandhi Savarkar Statement). शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधी यांना सावरकरांची पुस्तके वाचायला दिली पाहिजेत अशी सूचना केली होती. त्यानंतर आता शिवसैनिकांनीच राहुल गांधींना सावरकरांवरील पुस्तक भेट म्हणून दिल्लीला पाठवलं आहे.

शिवसैनिकांनी सावरकरांचं ‘माझी जन्मठेप’ हे पुस्तक राहुल गांधी यांच्या दिल्लीच्या निवासस्थानी पाठवले आहे (Majhi Janmathep).

काँग्रेस पक्षातर्फे दिल्लीत शनिवारी (14 डिसेंबर) भारत बचाव रॅलीत राहुल गांधी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. ‘माझं नाव राहुल गांधी आहे, राहुल सावरकर नाही. मी सत्याच्याच बाजूने आणि मरेपर्यंत माफी मागणार नाही’ असं वक्तव्य राहुल गांधींनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले. यामुळे सर्वच स्तरातून राहुल गांधींवर टीका केली जात आहे. राहुल गांधी यांना सावरकर समजावे म्हणून सावरकरप्रेमी शिवसैनिकांनी सावरकरांचे ‘माझी जन्मठेप’ हे पुस्तक सोमवारी (Savarkar Book to Rahul Gandhi) (16 डिसेंबर) जलद टपालाने विलेपार्ले पूर्व नेहरू रोड येथील पोस्ट कार्यालयातून दिल्लीला पाठवले.

“सावरकर हे अखंड हिंदू देशाचे दैवत आहेत. राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात म्हटलं, मी घाबरणार नाही, मी सावरकर नाही. हे वाक्य आमच्या मनाला लागलं. शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनातून राहुल गांधी यांना सावरकर समजणे खूप गरजेचे आहे, असे म्हटले. या आव्हानानुसार, पोस्टाने सावरकरांचं ‘माझी जन्मठेप’हे पुस्तक राहुल गांधी यांना पाठवलं.”

“त्यांनी वेळ काढून हे पुस्तक जरूर वाचावं आणि सावरकर काय आहे हे समजून घ्यावं. त्यांनी यापुढे सावरकरांविषयी आदराने वागावे. सावरकरांची या देशासाठीची तळमळ, त्यांचा त्याग या सर्वांचं राहुल गांधींनी वाचन करावं. अंदमान निकोबार भूमीचं श्रीफळ वाढवून पंतप्रधान पंडित नेहरू यांनी केलं होतं. आताच्या गांधी पिढीने पूर्वजांचा इतिहास समजला पाहिजे. हे पुस्तक वाचल्यावर राहुल गांधी स्वतः लोकसभेत सावरकरांना भारतरत्न द्यावा अशी मागणी करतील आणि मी सावरकर असं म्हणतील”, असं मत जितेंद्र जनावळे या शिवसैनिकाने व्यक्त केलं.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

‘मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. मरण पत्करेन पण माफी मागणार नाही’, असा आक्रमक पवित्रा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी घेतला होता. राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी मोदी सरकारवर निशाणा साधत भारतात ‘मेक इन इंडिया’ नसून ‘रेप इन इंडिया’ झाल्याचं म्हटलं होतं. या वक्तव्याचा भाजपकडून लोकसभेत निषेध करण्यात आला होता. राहुल गांधींनी देशाची माफी मागावी, अशी मागणीही भाजपने केली होती. यावर राहुल गांधींनी प्रत्युत्तर देताना सावरकरांविषयी वक्तव्य केलं.