
मुंबई : “ठाकरे गटाने खुशाल काँग्रेस नेत्यांना, पवार साहेबांना बोलवून दसरा मेळावा साजरा करावा. दसरा मेळावा हा विचारांचा मेळावा असतो. केवळ विचार सोडायचे आणि मेळावा साजरा करायचा याच्यात काही योग्य आहे असं मला वाटत नाही” असं शिवसेना आमदार आणि नेते दीपक केसरकर म्हणाले. संजय राऊत यांनी दीपक केसरकर यांच्यावर अनेक पक्ष बदलल्याचा आरोप केला. त्यावरही दीपक केसरकर यांनी उत्तर दिलं. “मी अनेक पक्ष बदलले नाहीत. मी संघर्ष केला, तुम्हाला त्या जिल्ह्यात पेट्रोल मिळत नव्हतं. हॉटेलमध्ये जागा मिळत नव्हती. उद्धव ठाकरेंना कार्यकर्त्यांच्या घरी रहाव लागायचं. अशी पकड राणेसाहेबांची त्या जिल्ह्यावर होती” असं दीपक केसरकर म्हणाले.
“तुम्ही विसरलात, लढा देताना मी सोबत होतो. उद्धवसाहेबांचा फोन आला, म्हणून मी गेलो. मी स्वत:हून गेलो नाही. निश्चित बाळासाहेबांच्या विचारामुळे शिवसेनेत गेलो” असं दीपक केसरकर यांनी सांगितलं. “मला पंतप्रधानांनी दिल्लीत बोलावलेलं. त्यावेळी मंत्री होऊ शकलो असतो, कोकणची जबाबदारी मिळाली असती. मनोहर पर्रिकर मला घेऊन गेले होते, त्यावेळी मी त्यांना म्हटलं की, शिवेसना-भाजपा युती अखंड राहिली पाहिजे. या युतीसाठी दुवा म्हणून काम करायला अधिक आवडेल” असं दीपक केसरकर म्हणाले.
‘संजय राऊत तोडणारा नेता’
“राणेसाहेब आणि माझे आज चांगले संबंध आहेत. तो वैचारिक लढा होता. तुम्ही त्यांना कधी हरवू शकला नाहीत. आज काही बोलताय पण त्यावेळी परिस्थिती काय होती? याचा विचार करा. उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची भेट घडवण्यात माझा मोठा वाटा होता. संजय राऊत तोडणारा नेता आहे आणि मी जोडणारा नेता आहे” असं दीपक केसरकर म्हणाले.