
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला बहुमत मिळाले. तर महाविकासआघाडीचा सुफडासाफ झाला. महायुतीने २३० जागांवर विजय मिळाला. तर महाविकासआघाडीला केवळ ४६ जागांवर समाधान मानावे लागेल. या निवडणुकीनंतर महाविकासआघाडीकडून सातत्याने ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी भाजपला ओपन चॅलेंज दिले आहे. लाज असेल तर ईव्हीएम बाजूला करा आणि एक तरी निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी दिले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज अंधेरीत मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यादरम्यान केलेल्या भाषणात ते बोलत होते. “मिर्झा राजे जयसिंग हिंदूच होता. पण गद्दार होता. तो प्रचंड सैन्य घेऊन आला. शिवाजी महाराजांना आग्र्याला जावं लागलं असतं. गोदी मीडिया असता तर सर्व संपलं. शिवाजी महाराजांचा काळ नाही असं सांगितलं असतं. पण शिवाजी महाराज औरंगजेबाच्या छाताडावर बसून आले. हा महाराष्ट्र आहे. लाज असेल तर ईव्हीएम बाजूला करा आणि एक तरी निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा. एक तरी”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
“महाराष्ट्र धर्म देशाचं आणि धर्माचं रक्षण करतो. आम्ही हिंदू आहोतच. पण महाराष्ट्र आणि मराठीच्या आड येणार नाही. तुम्ही हिंदूंच्या आड आला तर आम्ही कडवट हिंदू म्हणून तुमच्यासमोर आल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रावर प्रेम करणारं आमचं हिंदुत्व आहे. तुमचं काय आहे सांगा. जो हिंदू इस्लाम का द्वेष करतो तो हिंदू होऊ शकत नाही, असं मोदी म्हणालेत. मोहन भागवत मशिदीत जाऊन येतात”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
“हिंमत असेल तर तुमच्या झेंड्यातील हिरवा काढून दाखवा. आम्ही जी पहिली पोटनिवडणूक लढवली ती हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच लढली होती. हिंदू जरी असला आणि कुरुलकर सारखा पाक धार्जिणा असला तरी तो आमचा नाहीच. आम्ही ९७ची निवडणूक लढवल्यानंतर महाजन वगैरे आले. तेव्हा मातोश्रीचे उंबरठे झिजवायचे. हे भाजप आणि संघावाले असेच आहेत. काड्या लावायच्या, पेटवायचे आणि बाजूला व्हायचे. बाबरीवरून वातावरण तापवले आणि बाबरी पडल्यावर आम्ही नाही केलं असं म्हणून नामानिराळे राहिले. हे तुमचं हिंदुत्व. हा तुमचा नामर्दपणा. बाळासाहेबांचा मतांचा अधिकार काढून घेतला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांचा मतांचा अधिकार काढला. तेव्हा भाजपचं सरकार होतं”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
“भुजबळांनी बाळासाहेबांना अटक करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा आडवाणी उपपंतप्रधान होते. त्यांनी तेव्हा बाळासाहेबांना अटक झाली तर दंगल उसळेल म्हणून केंद्राचं दंगल नियंत्रक पथक, केंद्रीय राखीव दल भाजपने पाठवलं होतं. दंगल झाल्यावर बंदोबस्त करायला. हे तुमचं बाळासाहेबांवरचं प्रेम. काढायची झाली तर तुमची सालटी खूप काढली जातील. एवढी सालटी निघतील कि गावात फिरता येणार नाही. तुम्ही आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न करू नका”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.