
मुंबईतील चेंबूर परिसरातून अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. चेंबूर येथील सुभाष नगर, एन. जी. आचार्य मार्ग परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत मोठी दुर्घटना घडली. बिल्डिंग क्रमांक ३६ च्या पुनर्विकास कामादरम्यान सहा मजूर सहाव्या मजल्यावरुन कोसळले आहेत. त्यामधील एकाचा मृत्यू झाला आहे. तर पाच जणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस देखील घटनास्थळी पोहोचले आहेत.
एकाचा मृत्यू
प्राथमिक माहितीनुसार, काही मजुरांची प्रकृती गंभीर असून मृत्यूचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. संबंधित विभाग आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. जखमींमध्ये गुणधर राय (वय २२ वर्षे), उसराई (वय ३० वर्षे), रमेश राय (वय २५ वर्षे), विजय (वय ३५ वर्षे) आणि संदीप (वय २७ वर्षे)यांचा समावेश आहे. तर रामल्लू (वय ५५ वर्षे) यांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला आहे.
चेंबूर येथील अपघात झालेल्या इमारतीच्या बाहेर पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. इमारतीतील सर्वच कामगारांना बाहेर काढण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सुरक्षा पट्ट्या देखील पोलिसांकडून लावण्यात आल्या आहेत. घटनास्थळी अग्निशामक दलाची गाडी देखील दाखल झाली आहे महानगरपालिकेचे कर्मचारी देखील या ठिकाणी येणार असल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षा जाळ्या लावण्यात येतात तरीही अपघात कसा घडला याचा देखील तपास सुरू आहे.
किशोरी पेडणेकर यांची चेंबूर दुर्घटनेवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या घटनेला जबाबदार असलेल्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.