मुंबईकरांसाठी गुडन्यूज, दक्षिण मुंबईचा प्रवास होणार सुपरफास्ट, आजपासून नवा पूल प्रवाशांच्या सेवेत

१३० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दक्षिण मुंबईतील बेलासिस पूल अखेर वाहतुकीसाठी खुला होत आहे. मुंबई सेंट्रल आणि नागपाड्याला जोडणारा हा महत्त्वाचा दुवा असला तरी, सोयीसुविधांच्या अभावामुळे स्थानिकांमध्ये नाराजी आहे.

मुंबईकरांसाठी गुडन्यूज, दक्षिण मुंबईचा प्रवास होणार सुपरफास्ट, आजपासून नवा पूल प्रवाशांच्या सेवेत
mumbai
| Updated on: Feb 26, 2026 | 8:28 AM

दक्षिण मुंबईतील वाहतुकीचा कणा समजला जाणारा आणि गेल्या अनेक महिन्यांपासून पुनर्बांधणीच्या प्रतीक्षेत असलेला बेलासिस रेल्वे उड्डाणपूल अखेर २६ फेब्रुवारी रोजी प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. १३० वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला हा पूल आता नव्या स्वरूपात मुंबई सेंट्रल आणि नागपाडा या भागांना जोडण्यासाठी सज्ज झाला आहे. आज या पुलाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. मात्र, पुलाच्या नवीन आराखड्यात बस स्थानक आणि पादचाऱ्यांसाठीची सुविधा नसल्याने स्थानिक रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे अनेक लोकांनी या सोहळ्यावर नाराजीचे सावट पसरले आहे.

या पुलाचे लोकार्पण आज भव्य स्वरूपात पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) पुलाचे उद्घाटन करतील. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.

बेलासिस पूल सुरू झाल्यामुळे दक्षिण मुंबईतील वाहतुकीचे चित्र पालटणार आहे. यामुळे पठ्ठे बापूराव मार्ग, महालक्ष्मी स्थानक पूल आणि ताडदेव परिसरातील वाहतुकीचा ताण ५० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर पोहोचण्यासाठी वाहनचालकांना आता लांबचा वळसा घालण्याची गरज भासणार नाही. १८९० च्या दशकात बांधलेला हा पूल मोडकळीस आल्याने तो पाडण्यात आला होता. आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा पूल अधिक मजबूत बनवण्यात आला आहे.

पूल आमच्यासाठी की फक्त गाड्यांसाठी

पुलाचे काम पूर्ण झाले असले तरी, स्थानिक आणि ज्येष्ठ नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिकांनी अनेक मागण्या केल्या आहेत. जुन्या पुलावर बेस्ट बसचे अधिकृत थांबे होते, ज्यामुळे मुंबई सेंट्रल स्टेशनवरून उतरणाऱ्या प्रवाशांना बस पकडणे सोपे जात असे. नवीन पुलावर बस थांब्याची तरतूद नसल्याने नागरिकांना पायपीट करावी लागणार आहे.

जुन्या ब्रिटिशकालीन पुलावर खाली जाण्यासाठी पायऱ्या होत्या. नवीन पुलावर केवळ वाहनांच्या वेगाचा विचार करण्यात आला असून, पादचाऱ्यांसाठी सोयीस्कर एन्ट्री आणि एक्झिट पॉईंट्स नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. आम्हाला पुलाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चालत जावे लागेल, मध्ये कुठेही उतरण्याची सोय नाही अशी तक्रार परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.

प्रशासनाची भूमिका

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक कारणांमुळे आणि रेल्वे सुरक्षा नियमांमुळे काही बदलांचा समावेश आराखड्यात करण्यात आला आहे. मात्र, नागरिकांच्या वाढत्या मागणीनंतर आता प्रशासन यावर फेरविचार करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us