ठाण्यात परप्रांतीयांच्या अँटीजेन टेस्टला रिक्षावाल्यांचा विरोध, मुजोर रिक्षावाल्यांना सह आयुक्तांचा दणका

| Updated on: Oct 16, 2020 | 12:18 PM

रांगा लावून हे प्रवासी आपापली टेस्ट करुन घेत असतांनाच सॅटिस पुलाखाली असलेल्या रिक्षावाल्याने मात्र मुजोरी करायला सुरुवात केली.

ठाण्यात परप्रांतीयांच्या अँटीजेन टेस्टला रिक्षावाल्यांचा विरोध, मुजोर रिक्षावाल्यांना सह आयुक्तांचा दणका
Follow us on

ठा णेः गेल्या काही दिवसांपासून राज्यात परप्रांतातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली असून, ठाणे रेल्वे स्थानकात परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना अँटीजेन टेस्ट केली जात आहे(Thane Auto Rikshaw Driver). परंतु सॅटिस पुलाखाली असलेले मुजोर रिक्षावाले यात अडथळे निर्माण करत होते. या मुजोर रिक्षाचालकांची पालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांची छेडछाड करण्यापर्यंत मजल गेली आहे. महिलांची छेड काढल्याच्या प्रकरणावरून संतापलेल्या सहआयुक्तांनी थेट एका रिक्षावाल्याचा श्रीमुखात भडकावली, त्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. (Thane Auto Rikshaw Driver).

कोरोनाच्या भीतीने आपापल्या गावी निघून गेलेले परप्रांतीय मजूर पुन्हा एकदा मुंबईकडे मोठ्या संख्येने येऊ लागले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता बळावली होती. यावर तोडगा म्हणून ठाणे महानगरपालिकेने, आलेल्या सर्वांची मोफत अँटीजेन टेस्ट करुन घेण्याची व्यवस्था सॅटिस पुलावर केली.

रांगा लावून हे प्रवासी आपापली टेस्ट करुन घेत असतांनाच सॅटिस पुलाखाली असलेल्या रिक्षावाल्याने मात्र मुजोरी दाखवायला सुरुवात केली. आलेल्या प्रवाशांना खालच्या खाली पळवण्याचा धडाका त्यांनी लावला. कोणतीही चाचणी न करता प्रवाशांना आपल्या रिक्षात बसवू लागले. हे माजोरडे रिक्षावाले एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी आपली ड्युटी इमानेइतबारे बजावत असलेल्या पालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली (Thane Auto Rikshaw Driver).

समोर उभे राहून अश्लील हावभाव करणे आणि अश्लील कॉमेंट पास करण्यापर्यंत त्यांची मजल गेल्याचे कळताच कोपरी नौपाडा प्रभागाच्या सह आयुक्त प्रणाली घोंगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या रिक्षावाल्यांना जाब विचारला. अधिकाऱ्यांना बघून हे बेशिस्त रिक्षावाले आणखीनच चेकाळले आणि त्यांनी प्रणाली घोंगे यांच्याशी असभ्य भाषेत बाचाबाची केली. यावर संतापलेल्या सह आयुक्तांनी रिक्षावाल्यांच्या दबावाला बळी न पडता आपल्या महिला कर्मचाऱ्यांच्या अस्मितेसाठी एका मुजोर रिक्षावाल्याच्या कानाखाली खणखणीत आवाज काढला.

त्यानंतर रेल्वे स्थानक परिसरात मोठा गोंधळ उडाला आणि रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सह आयुक्त प्रणाली घोंगे यांना जाब विचारला. कोणत्याही दबावापुढे न झुकणाऱ्या घोंगे मॅडम यांनी सर्वांनाच चोख उत्तर देत आपली बाजू प्रभावीपणे मांडली. या सर्व प्रकारची माहिती मिळतच नौपाडा आणि ठाणेनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.

सॅटिस पुलाखाली नौपाडा पोलिसांची एका चौकी होती, तोपर्यंत या माजोरड्या रिक्षावाल्यांवर चांगलाच वचक होता परंतु काही कारणास्तव ही चौकी येथून हटविल्यानंतर या रिक्षा टॅक्सी वाल्याना येणाऱ्या प्रवाश्याना लुटण्याचा जणू परवानाच मिळाला. अव्वाच्या सव्वा भाडे आकारणे, थेट रेल्वे स्थानकापर्यंत जाऊन प्रवाश्याना जवळपास खेचत आणणे असले प्रकार इथे सर्रास पहायला मिळतात.

याबाबत अनेकदा तक्रार करुन देखील काहीही कारवाई न झाल्याने आज या रिक्षावाल्यांची मजल सहआयुक्तांशी पंगा घेण्यापर्यंत पोहोचली आहे. हे मुजोर रिक्षावाले जर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असे वर्तन करत असतील तर सामान्यांना दहशत माजवून कसे लुटत असतील याचा विचार करणे आवश्यक झाले आहे. या रिक्षा आणि टॅक्सी वाल्यांवर जरब बसावी म्हणून सॅटिस खाली एक पोलीस चौकी स्थापन करण्याची जनतेची मागणी लवकरात लवकर पूर्ण व्हावी असे अनेकांनी बोलून दाखवले.

Thane Auto Riksha Driver

संबंधित बातम्या :

World Hand Washing Day | 20 सेकंदात जंतूंचा नाश, कोरोना विषाणू संक्रमणामुळे ‘हात धुण्याचे’ महत्त्व अधोरेखित!

कोरोनाने सख्या भावांचा एकाच दिवशी मृत्यू, दोघेही माजी सरपंच, अख्ख्या गावाने हंबरडा फोडला