देशातील पहीली एसी डबल डेकर बस मुंबईत या तारखेला लाँच होणार, या मार्गावर धावणार पहिली बस

सांताक्रुझ ते कुर्ला मार्गावर देशातील पहिल्या ई-डबल डेकर बसला लाँच करण्याची बेस्टची योजना आहे. ही डबल डेकर बॅटरीवर धावणार असून संपूर्ण वातानुकूलित असलेल्या या डबलडेकरला दोन दरवाजे आहेत.

देशातील पहीली एसी डबल डेकर बस मुंबईत या तारखेला लाँच होणार, या मार्गावर धावणार पहिली बस
Best e-double decker
Image Credit source: socialmedia
| Updated on: Feb 09, 2023 | 10:55 AM

मुंबई : मुंबईकरांची आवडती डबलडेकर  (DOUBLEDECKER ) आता नव्या अत्याधुनिक इलेक्ट्रीक अवतारात  मुंबईकरांच्या सेवेसाठी हजर होत आहे. पुढच्या आठवड्यातच या डबल डेकर बसचा प्रवास सुरू होणार असून सुरूवातीला सांताक्रुझ ते कुर्ला मार्गावर तिला इंट्रोड्यूस करण्याची योजना आहे. ही डबल डेकर बॅटरीवर धावणार असून संपूर्ण वातानुकूलित असलेल्या या डबलडेकरला दोन दरवाजे आहेत. येत्या मार्च अखेर अशा 200 एसी इलेक्ट्रीक (  Ac Electric  ) डबल डेकर बेस्टच्या  ( BEST )  ताफ्यात समाविष्ठ होणार आहेत. सुरूवातीला सांताक्रुझ ते कुर्ला या मार्गावर या डबल डेकर बस चालवल्या जाणार आहेत. बेस्टचे महाव्यवस्थापकांनीच ही माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली आहे.

बेस्टच्या डबल डेकर बस चालविण्यासाठी बेस्टने मार्गांची निवड केली आहे. कुलाबा, मजास, आणि कुर्ला डेपोत या बसेस उभ्या करण्याची सोय करण्याची योजना आहे. बेस्टच्या डीझेल इंधनावरील डबल डेकर चालल्या होत्या, त्याच पारंपारिक मार्गांवर प्रायोगिक तत्वावर नव्या इलेक्ट्रीक बस चालविण्याची योजना आहे. बस जशा टप्प्या टप्प्याने दाखल होतील तशा त्यांच्या पारंपारीक मार्गांवर दाखल होताल, त्यासाठी कुलाबा, मजास, आणि कुर्ला आगारांत बसेसच्या चार्जिंग पॉईंटची व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.

ध्वनी आणि वायू प्रदुषण नियंत्रण करणाऱ्या या इलेक्ट्रीक बसेस सध्या प्रचंड लोकप्रिय होत आहेत. सध्या बेस्टच्या ताफ्यात प्रिमियम बसेससह
410 ई – बसेस आहेत. काही दिवसांपूर्वी सुमारे 50 हजार कोटींचा मुंबई महानगर पालिकेचा अर्थसंकल्प सादर झाला असून त्यात बेस्टच्या ताफ्यात तीन हजार नविन इलेक्ट्रीक बसेस सामाविष्ट करण्याची बेस्टची योजना असल्याचे म्हटले होते.

आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये बेस्टने मुंबई शहरात तब्बल चार हजार ई – बसेस दाखल करण्याचे म्हटले आहे. सध्या बेस्टच्या पाच आगारात बेस्टच्या इलेक्ट्रीक बसेसच्या चार्जिंग पॉईंटची व्यवस्था करण्यात आली आहे. लवकरच 27 आगारात ई – चार्जिंगची सुविधा उभारण्यात येणार आहे.

दोन दरवाजांच्या डबल डेकर

नव्या ई- डबल डेकरमध्ये 78 प्रवाशांच्या बसण्याची व्यवस्था आहे. या बसेसना दोन दरवाजे आहेत. या बसेसची रंगसंगती आकर्षक असून या बसेस लंडनच्या स्विच मोबिलीटी या कंपनीच्या असून भारतात त्यांनी हिंदूजा ग्रुप बरोबर करार केला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते देशातील पहिल्या ईलेक्ट्रीक डबल डेकरचे अनावरण गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात यशवंतराव चव्हाण सेंटर येथे एका भव्य सोहळ्यात करण्यात आले होते.