लोकल-कार्यालये एक नोव्हेंबरपासून उघडा, TIFR चा बीएमसीला अहवाल, शाळांसाठी ‘ही’ तारीख

| Updated on: Sep 06, 2020 | 2:29 PM

मुंबई लोकल आणि कार्यालये एक नोव्हेंबरपासून, तर शाळा एक जानेवारीपासून सुरु कराव्यात, अशा सूचना टीआयएफआरने महापालिकेला केल्या आहेत

लोकल-कार्यालये एक नोव्हेंबरपासून उघडा, TIFR चा बीएमसीला अहवाल, शाळांसाठी ही तारीख
Follow us on

मुंबई : मुंबई लोकल आणि कार्यालये एक नोव्हेंबरपासून पूर्ण क्षमतेने उघडली जावीत, तर शाळा एक जानेवारीपासून सुरु कराव्यात, अशा सूचना ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ने (टीआयएफआर) केल्या आहेत. गणितीय पद्धतीने ‘कोव्हिड’चा अभ्यास करुन TIFR ने मुंबई महापालिकेला अहवाल सादर केल्याची माहिती आहे. अर्थात हा फक्त प्रस्ताव असून त्यावर मुंबई महापालिका किंवा राज्य सरकार अंतिम निर्णय घेईल. (TIFR asks BMC to run Mumbai locals offices by November 1st and schools in January)

गणितीय पद्धतीने शास्त्रीय मॉडेल तयार करत हा अहवाल बीएमसीला सादर केल्याचे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलं आहे. जानेवारी 2021 पासून शाळा सुरु व्हाव्यात, असे या मॉडेलनुसार सांगितले. ‘स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी अँड कॉम्प्युटर सायन्स’चे अधिष्ठाता संदीप जुनेजा, प्रल्हाद हर्ष आणि रामप्रसाद सप्तर्षी यांनी हा अहवाल तयार केला आहे.

‘हर्ड इम्युनिटी’चा विचार करता डिसेंबर किंवा जानेवारीपर्यंत झोपडपट्टी भागात राहणाऱ्या 75 टक्के, तर इतर भागातील 50 टक्के व्यक्तींच्या शरीरात अँटीबॉडी तयार झाल्या असतील, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. मात्र पुनर्संसर्ग (reinfection) या मुद्द्याकडे अहवालात कानाडोळा झाला आहे.

सप्टेंबरमध्ये मुंबई शहरातील कार्यालयातील उपस्थिती आणि वाहतूक व्यवस्था 30 टक्के क्षमतेसह सुरु होऊ शकतात. ऑक्टोबरमध्ये ही क्षमता 50 टक्क्यापर्यंत वाढवता येऊ शकते. तर एक नोव्हेंबरपासून संपूर्ण शहराचं जनजीवन पूर्ववत सुरु करता येऊ शकतं, असा अनुमान डॉ. जुनेजा यांनी मांडला. 16 सप्टेंबरलाच पूर्णपणे सर्व गोष्टी उघडल्यास दुसरी लाट येण्याची भीती अधिक आहे, असे यात म्हटले.

सार्वजनिक वाहतूक सेवेत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले गेलेच पाहिजेत. याशिवाय तोंडाला मास्क लावणे, हातांची स्वच्छता आणि ट्रेन्स तसेच कार्यालयांचे नियमित निर्जंतुकीकरण केलं गेलं पाहिजे, अशा सूचनाही या अहवालात करण्यात आल्या आहेत.

(TIFR asks BMC to run Mumbai locals offices by November 1st and schools in January)