अवघ्या 20 दिवसाच्या बाळाच्या तस्करीचे बिंग फुटले, साडेसहा लाखात सौदा, जालना ते रत्नागिरी विक्रीचे नेटवर्क, 10 आरोपींना अटक
Child Trafficking Racket: २० दिवसांच्या बाळाच्या तस्करीचे बिंग फुटले. साडेसहा लाखात सौदा ठरला आणि अडीच लाखांत विक्री त्याची विक्री झाली. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी कारवाई करत दहा आरोपींना अटक केली आहे.

Child Trafficking Racket : मुंब्र्यात अवघ्या २० दिवसांच्या नवजात बाळाची अडीच लाख रुपयांना खरेदी-विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. बाळाच्या विक्रीचा अडीच लाखांपासूनचा व्यवहार थेट पुढे साडेसहा लाखांच्या सौद्यापर्यंत पोहचला. जालना ते रत्नागिरी असा बाळाच्या विक्रीचा प्रवास सुरू होता. मुंब्रा पोलिसांनी बाळाच्या तस्करीचे बिंग फोडले. बाळाला सुखरूप ताब्यात घेत दहा आरोपींच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी आणखी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. नवजात बालकांच्या विक्रीचे मोठे रॅकेट या कारवाईतून समोर आले आहे.
काय आहे प्रकरण?
कळवा येथील शांतीनगर परिसरात अनिसा रफीक शेख ही तरुणी राहते. मुंब्रा रेल्वे स्थानकात ती भीक मागते. तिच्या अवघ्या २० दिवसांच्या बाळाची विक्री झाली. तिच्या आरोपानुसार रेहान रिजवान शेख याने त्यासाठी तिच्यावर दबाव टाकला. या बाळाचा अडीच लाखात सौदा झाला. हा प्रकार उघड होऊ नये यासाठी फिर्यादीला १ लाख ९५ हजार रुपये देण्यात आले. बाळाच्या विक्रीसाठी आईवर दबाव टाकत व्यवहाराची रक्कमही लुटल्याचा प्रकार समोर आला. आई आणि तिच्या बहिणीला वायरने बेदम मारहाण करून पैसे हिसकावले.अनिसाने ५ नोव्हेंबर रोजी मुंब्रा पोलीस ठाण्यात धाव घेतली. आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.
जालना ते रत्नागिरी असा बाळाचा प्रवास
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी बाळाला सुखरूप परत आणण्यासाठी पथक तयार केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी तपासासाठी पाच स्वतंत्र पथकं तयार केली. महिला पोलीस निरीक्षक वृषाली पवार, पोलीस निरीक्षक शरद कुंभार, प्रशांत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस सावंत, राम दळवी यांनी तपासाला वेग दिला. मुंब्रा पोलिसांनी पाच पथके तयार करून मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण आणि जालन्यात कारवाई केली. बाळाचा प्रवास मुंब्रा ते कल्याण, दिवा ते रत्नागिरीपर्यंत झाल्याचे तपासात उघड झाले. रत्नागिरीतून बाळाची सुखरूप सुटका करण्यात आली. या प्रकरणात दहा आरोपींना अटक करण्यात आली. न्यायालयाने सर्व आरोपींना १० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.