Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा पुन्हा दणका, FDAची टीम थेट कोर्टात, स्वच्छतागृहाच्या टाकीवर स्वयंपाकघर पाहताच… काय घडलं?
Tukaram Mundhe: कल्याण न्यायालयाच्या कॅन्टीनवर FDAने धाड टाकली आहे. पाहणी करताना FDAच्या टीमला स्वच्छतागृहाच्या टाकीवर स्वयंपाकघर चालवत असल्याचे दिसले. त्यानंतर FDAने मोठा निर्णय घेतला.

कल्याण न्यायालयाच्या आवारातील कॅन्टीनमधील धक्कादायक अस्वच्छता समोर आली आहे. स्वच्छतागृहाच्या टाकीवरच स्वयंपाकघर उभारून सिलेंडर ठेवत पदार्थ तयार केले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. कॅन्टीनसमोरून सांडपाणी वाहत असल्याने दुर्गंधी, माशांचा त्रास आणि अस्वच्छ वातावरणाबाबत वकील संघटनेने FDA कडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करत हे उपाहारगृह बंद केले आहे.
नेमकं प्रकरण काय?
कल्याण न्यायालयाच्या आवारातील कॅन्टीनमध्ये नियमांची अक्षरशः पायमल्ली होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वच्छतागृहाच्या टाकीवरच स्वयंपाकघर उभारण्यात आले होते. याच ठिकाणी सिलेंडर ठेवून खाद्यपदार्थ तयार केले जात असल्याचे FDA च्या पाहणीत समोर आले. इतकंच नाही तर कॅन्टीनसमोरून स्वच्छतागृहातील सांडपाणी वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती.
FDA अधिकाऱ्यांनी केली पाहणी
अन्नपदार्थांवर माशा घोंघावत होत्या, तर धूळ आणि अस्वच्छ वातावरणात नागरिकांना खाद्यपदार्थ दिले जात होते. या अस्वच्छतेविरोधात कल्याण बार असोसिएशनकडून अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर FDA अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता कॅन्टीन चालकाकडे आवश्यक परवानाही नसल्याचे आढळून आले. ठाणे जिल्हा न्यायालयीन चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी चहाची टपरी चालविण्यास परवानगी देण्यात आली होती.
अनधिकृत विस्तार करून उपाहारगृह सुरू
मात्र, टपरीचा अनधिकृत विस्तार करून उपाहारगृह सुरू केल्याचा आरोप आहे. तक्रारीची दखल घेत FDA ने धडक कारवाई करत हे उपाहारगृह तातडीने बंद केले आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आवारातील या कॅन्टीनच्या अस्वच्छ कारभारावर अखेर कारवाई झाली आहे.