Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : संदीपान भुमरे आणि चंद्रकांत खैरेंमध्ये मंचावरच शाब्दिक चकमक, पाहा Video

ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे आणि संदीपान भुमरे यांच्यामध्ये शाब्दीक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं. सत्कार आणि प्रोटोकॉलवरुन गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात दोन्हीही नेते मंचावरच भिडले. पाहुयात या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : संदीपान भुमरे आणि चंद्रकांत खैरेंमध्ये मंचावरच शाब्दिक चकमक, पाहा Video
| Updated on: Sep 07, 2024 | 11:43 PM

छत्रपती संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे आणि चंद्रकांत खैरेंमध्ये हमरीतुमरी झाल्याचं पाहायला मिळालं. सत्कार आणि प्रोटोकॉलच्या मुद्द्यावरुन या दोन्ही नेत्यांमध्ये मंचावरच तू-तू मैं-मै झाली. चंद्रकांत खैरे आणि माजी महापौर नंदकुमार घोडेलेंवर पक्षपाताचा आरोप करत संदीपान भुमरेंनी खैरेंनाही दम भरला.

नेमकं काय घडलं? संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे आणि चंद्रकांत खैरे गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात मंचावर एकत्र आले होते. यावेळी ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे आणि माजी महापौर नंदकुमार घोडीले पक्षपात करत असल्याचा आरोप संदीपान भुमरेंनी केला. त्यानंतर भर व्यासपीठावर संदीपान भुमरे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात मानापमान नाट्य रंगलं. चंद्रकांत खैरेंचं नाव अगोदर घेतल्यानं प्रोटोकॉल का पाळत नाही? असा प्रश्न संदीपान भुमरे यांनी विचारला. तसंच चंद्रकांत खैरेंना संदीपान भुमरे यांनी मंचावर दम देखील भरला. यानंतर मचावर उपस्थित अतुल सावे आणि भागवत कराड यांनी दोघांमधला वाद सोडवला.

पाहा व्हिडीओ:-

मंचावर झालेल्या वादानंतर दोन्ही नेत्यांनी पुन्हा एकदा एकमेकांविरोधात शाब्दीक हल्ला चढवला. संदीपान भुमरेंना समज देण्याचा सल्ला चंद्रकांत खैरेंनी दिला. तर आपण माजी झालो हे खैरेंना समजत नसल्याचा टोला संदीपान भुमरेंनी लगावला. संदीपान भुमरे आणि खैरेंमध्ये झालेल्या शाब्दीक चकमकनंतर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी संदीपान भुमरेंना टोला लगावलाय. देवाच्या दारी राजकारण करण्याची गरज नसल्याचं अंबादास दानवेंनी म्हटलंय.

शिवसेनेमध्ये झालेल्या बंडानंतर संदीपान भुमरे आणि चंद्रकांत खैरेंमध्ये वादाची मालिका सुरुच आहे. लोकसभा निवडणुकीतही हे दोन्ही नेते एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. मात्र, निवडणुकीनंतरही या दोन्ही नेत्यांमधला वाद न क्षमता तो अजूनच वाढत चाललाय.