आरे कॉलनीतील विहिरीत दोन विद्यार्थिनींची आत्महत्या

आरे कॉलनीतील विहिरीत दोन विद्यार्थिनींची आत्महत्या

राजेश शिंदे, टीव्ही 9, मराठी, मुंबई : गोरेगावच्या आरे कॉलनीतील विसावा विहिरीत दोन १६ वर्षीय विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याची घटना पुढे आली आहे. या घटनेने आरे कॉलनी परिसरात खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे शासनाकडे आरे वसाहतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पोलिसांनी लेखी तक्रारी करूनही या विहरीवर सुरक्षा भिंत किंवा जाळी बसवली गेली नाही. आतापर्यंत काही महिन्यांत या विहिरीने ५ बळी घेतले आहेत.

आरे कॉलनीत १९७३ सालची विसावा नावाची विहीर आहे. मात्र आता ही विहीर ‘मौत का कुआं’ बनली आहे. मंगळवारच्या संध्याकाळी दोन १६ वर्षीय विद्यार्थिनींनी याच विसावा विहरीत उडी घेत आत्महत्या केली. या दोघी आरे वसाहतीजवळील खंबाचा पाडा येथील रहिवासी होत्या.

प्रत्यक्षदर्शी निशा पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघी एका तरुणासोबत दिसल्या होत्या आणि त्या रडत होत्या. या दोघी का रडत होत्या, तो तरूण मुलगा कोण होता? याचा तपास पोलीस करत आहेत.

स्थानिक रहिवाशी निलेश धुरी यांनी दिलेली माहिती अतिशय संतापजनक आहे. गेल्या काही महिन्यांत या जीवघेण्या विहिरीने एकूण पाच बळी घेतले आहेत. या घटनेआधी एका महिलेनं आत्महत्या केली होती, तर २ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही आपले जीवन संपवले होते. ‘सुसाईड पॉईंट’ बनलेल्या या विहिरीवर सुरक्षा भिंत किंवा जाळी बसवण्यात यावी, यासाठी धुरी, आरेचे सीईओ, आरे पोलीस यांनी शासनाकडे अनेक लेखी तक्रारी दिल्या. तरी शासनाने निधी अभावी सुरक्षा भिंत किंवा जाळी बसवली नाही, असे धुरी यांनी सांगितले.

आता आणखी किती जीव गेल्यानंतर शासनाला जाग येईल, असा उद्विग्न प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI