
मुंबई : आपल्याकडे थोड्या श्रद्धा अंधश्रद्धा असतात. मग तो पितृपक्ष असतो. त्याबद्दल बरेच गैरसमज आहेत. मी नाही मानत. कारण माझ्या आजोबांनी मला नाही शिकवलं. माझा पक्ष हा पितृपक्षच आहे. कारण वडिलांनी स्थापन केला आहे, असे मत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केले. शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित पक्षाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. आज शिवसेनेने (Shivsena) 56 वर्ष पूर्ण केल्यानिमित्त त्यांनी सर्व शिवसैनिक आणि महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते आणि सुभाष देसाई यांचेही कौतुक त्यांनी यावेळी केले. शिवसेना पितृपक्ष आहे, असे म्हणत माझ्या वडिलांनीच या पक्षाला जन्म दिला, तेव्हा पितृपक्ष ही अंधश्रद्धा (Superstition) न मानता आपला पक्ष पितृपक्ष, असे ते म्हणाले.
शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना पुढे ते म्हणाले, की मी उभे राहून बोलू शकतो, हे वांद्रे सभेत दाखवून दिले आहे. नाही तर टिप्पणी यायची उद्धव ठाकरे बसून बोलले. अनेक शतके शिवसेना राहणार आहे. सर्वांना शुभेच्छा देतो. संजय राऊत यांनी फादर्स डेचा उल्लेख केला. अभिमान नक्कीच आहे. कारण माझ्या वडिलांनीच या पक्षाला जन्म दिला. तेव्हा पितृपक्ष असं काही नसतं. प्रत्येक दिवस आपला असतो. 56 वर्षातील अनेक गोष्टी मनात ताज्या आहेत. मी पहिल्यांदा पक्षप्रमुखपदाची सूत्रे हाती घेतली. तेव्हा माझ्या डोळ्यासमोर नकळत एक क्षण तरळून गेला. शिवसेना स्थापनेचा तो क्षण. शिवाजी पार्कातील ते घर. वन बीएचकेचं घर. माझे आजोबा. दोन काका. माँ. सर्व होते. सर्व प्रसंग सांगणार नाही. तुम्हाला माहीत आहे. सिनेमात आहे, असे ते म्हणाले.
शिवसेना स्थापन झाली. त्या क्षणाचे साक्षीदार मी आणि आमच्या कुटुंबातील एकदोन जण असतील. मी तेव्हा सहा वर्षाचा होतो. माझ्यासमोर शिवसेना स्थापनेचा नारळ फुटला होता. नारळाचं पाणी माझ्या अंगावर उडाले होते. जोश होता गंमत होती. ते शिंतोडे मला भिजवून टाकतील असं मला वाटलं नव्हतं. जबाबदारी काय असते हे माहीत नव्हतं. तुमच्यासारखे सवंगडी मिळाले. शिवसेना प्रमुखानंतर शिवसेनेचं काय याला आपण कणखरपणाने उत्तर देत आलो आहोत. नंतरही देऊ. मात्र जीवाला जीव देणारे शिवसैनिक मिळाले, हे माझं भाग्य असे म्हणत शिवसैनिकांचे आभार त्यांनी मानले.