योजना, विकास प्रकल्पांचा निधी दुष्काळासाठी वापरा… उद्धव ठाकरे यांची सर्वात मोठी मागणी

राज्यावर गंभीर दुष्काळाचे संकट असल्याने, उद्धव ठाकरे यांनी विकास प्रकल्पांसाठी असलेला निधी तातडीने दुष्काळ निवारणासाठी वळवण्याची मागणी केली आहे. बुलेट ट्रेनसारखे प्रकल्प केवळ कंत्राटदारांसाठी असल्याचा आरोप करत, शेतकऱ्यांच्या मदतीला प्राधान्य देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

योजना, विकास प्रकल्पांचा निधी दुष्काळासाठी वापरा... उद्धव ठाकरे यांची सर्वात मोठी मागणी
uddhav thackeray
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 24, 2026 | 1:35 PM

राज्यावर दुष्काळाचं विचित्र संकट आलं आहे. पुढच्या पावसापर्यंत शेतकऱ्यांना या संकटाची झळ पोहोचणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे. राज्यात ज्या योजना सुरू आहेत. जे विकास प्रकल्प सुरू आहेत. ते केवळ कंत्राटदारांच्या भल्यासाठी आहेत. त्यामुळे प्राधान्य म्हणून सरकारने या योजना आणि विकास प्रकल्पांचा निधी दुष्काळासाठी वापरावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे.

विकासाच्या नावाने राज्यात उधळपट्टी सुरू आहे. राज्याला बुलेट ट्रेनची गरज नाही. जे काही प्रकल्प सुरू आहेत. ते केवळ कंत्राटदारांचं धन आहे. दुष्काळात जशा आपण प्राथमिकता बदलतो, तशीच प्राथमिकता आता बदलली पाहिजे. लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. विकास प्रकल्पांसाठी जो निधी खर्च केला जात आहे. तो निधी दुष्काळासाठी वापरला पाहिजे. इतर ठिकाणी कारण नसताना वळवलेला पैसा या कामासाठी वळवा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दुष्काळी भागाची पाहणी करणार

यावेळी उद्धव ठाकरे यांनी दुष्काळी भागाची पाहणी करणार असल्याचं सांगितलं. मी विदर्भात जाऊन पाहणी करणार आहे. आधी आदित्य ठाकरे जाऊन दुष्काळी भागाची पाहणी करेल. त्यानंतर मी जाऊन पाहणी करणार आहे. तसेच ज्या ठिकाणी दुष्काळ आहे, तिथे शिवसैनिकांनी हेल्प सेंटर सुरू करून शेतकऱ्यांना मदत करावी, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

मदत किती पोहोचली?

इतिहासातील 31 हजार कोटींचं पॅकेज मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं. ज्यांची जमीन खरडून गेली होती, त्यांना हेक्टरी साडे तीन लाख रुपये जाहीर केले होते. त्यांना प्रत्यक्ष किती मदत पोहोचली? त्याची माहिती सरकारने दिली पाहिजे. यावर्षी मोसमाच्या सुरुवातीलाच दुष्काळ पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने दिला होता. जागतिक अभ्यास केंद्रांनीही त्याचा इशारा दिला होता. ही शक्यता लक्षात घेऊन दुष्काळ निवारणासाठी पावलं उचलली होती का? शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागते. यावर्षीची हालत भयंकर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने काय केलं ते सांगावं, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

कॅबिनेट घेताच कशाला?

5 ऑक्टोबर नंतर पंचनामे सुरू होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाची मी खिल्ली उडवली होती. कारण शेतकऱ्यांचे प्राण कंठाशी आले आहेत. त्यांच्या हाताला काहीच लागलेलं नाही. त्यामुळे सरकारने नियमांची वाट पाहू नये. त्यांनी तातडीने मदत करावी. दोन ते तीन दिवसात मदत करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. परत दोन तीन दिवस कशाला? तुम्ही कॅबिनेट घेता कशाला? केवळ दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? असा सवाल त्यांनी केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us