सोनू, तुझा माझ्यावर भरवसा नाय काय? म्हणून तुम्ही दुसरा…उद्धव ठाकरे यांनी साधले अचूक टायमिंग

Udhav Thackeray Pinch CM Fadnavis : राज्याच्या राजकारणाने 2019 मध्ये सर्वात मोठी कूस बदलली. त्यानंतर अशी काही वळणं आलीत की कुणावर भरवसा ठेवायचा असा प्रश्न उपस्थित झाला. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी नेमका हाच धागा पकडून जुन्या मित्राला चिमटा काढला आहे.

सोनू, तुझा माझ्यावर भरवसा नाय काय? म्हणून तुम्ही दुसरा...उद्धव ठाकरे यांनी साधले अचूक टायमिंग
उद्धव ठाकरे यांचा मिश्किल टोला
Image Credit source: गुगल
| Updated on: Mar 21, 2025 | 9:20 AM

महाराष्ट्राच्या राजकारणात 2019 मध्ये सर्वात मोठे वळण आले. त्यानंतर राजकारण वळणदार झाले. कोण कोणत्या खेम्यातील हेच कळेनासे झाले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतरही महाविकास आघाडी आणि महायुतीमधील धुसफूस सुरूच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात एका वाक्यातील मनोगत व्यक्त करताच राजकारणाला अस्सल फोडणी बसली. मग उद्धव ठाकरे यांनी सुद्धा हाच धागा पकडून जुन्या मित्राला चिमटा काढला. ठाकरेंच्या टायमिंगची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या त्या वक्तव्याने वादळ

एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. त्यात रॅपिड फायर राऊंडमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी दोन वाक्यात मत व्यक्त करा, असं जयंत पाटील यांनी फडणवीसांना विचारलं. एक पाऊल पुढं येत मुख्यमंत्र्यांनी एकाच वाक्यात उत्तर देतो, असं सांगितले. या दोघांसाठी त्यांनी एकच वाक्य वापरलं. दोघांचा काहीही भरवसा नाही, असे खरमरीत उत्तर दिलं. मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव सुद्धा बरंच काही सांगून गेले.

तुझा माझ्यावर भरवसा नाय काय?

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याने राजकारणात एकच वादळ आलं. पण त्याला उद्धव ठाकरे यांनी मिश्किल शैलीत उत्तर दिलं आहे. काल पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला उत्तर दिले. एक गाणं होतं, असा उल्लेख करत, सोनू, तुझा माझ्यावर भरवसा नाही का? असा चिमटा काढला. पुढे त्यामुळेच तुम्ही दुसरा घरोबा केलाय का? असा मिश्किल टोला त्यांनी लगावला.

गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गट, सामना आणि संजय राऊत हे सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्या काही निर्णयाचे स्वागत करताना दिसून आले. फडणवीस यांच्या काही निर्णयाचे स्वागत, कौतुक सुद्धा करण्यात आले.  तर काही जण फडणवीस यांना अडचणीत अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचे संकेत देत आहेत. त्यावरून शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यातील विरोधाची धार कमी झाल्याचे मानण्यात येत होते.