संदीप देशपांडेंविरोधात वरुण सरदेसाईंचा अब्रुनुकसानीचा दावा; देशपांडेंना आरोप भोवणार?

| Updated on: Mar 16, 2021 | 1:59 PM

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरून आरोप करणं महागात पडण्याची शक्यता आहे. (varun sardesai filed defamation case against sandeep deshpande)

संदीप देशपांडेंविरोधात वरुण सरदेसाईंचा अब्रुनुकसानीचा दावा; देशपांडेंना आरोप भोवणार?
sandeep deshpande
Follow us on

मुंबई: मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरून आरोप करणं महागात पडण्याची शक्यता आहे. या प्रकरणी शिवसेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी देशपांडे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. त्यामुळे देशपांडे यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. या आधी सरदेसाई यांनी देशपांडे यांना या प्रकरणी नोटीस बजावली होती. (varun sardesai filed defamation case against sandeep deshpande)

संदीप देशपांडे यांनी महापालिकेतील कोविडचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर मांडला होता. या भ्रष्टाचारात सत्ताधाऱ्यांचा सहभाग असल्याचा दावाही त्यांनी केला होता. यावेळी देशपांडे यांनी या भ्रष्टाचारात पेंग्विन गँग असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे सरदेसाई यांनी या प्रकरणी देशपांडे यांना जानेवारीत वकिलामार्फत नोटीस बजावली होती. त्यानंतर आता सरदेसाई यांनी देशपांडे यांच्याविरोधात मॅजिस्ट्रेट कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. त्यामुळे देशपांडे यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.

सरदेसाई म्हणजे रडू बाई रडू

सरदेसाई यांनी दावा केल्याने त्यावर देेशपांडे यांनी उत्तर दिलं आहे. वरुण सरदेसाई म्हणजे रडू बाई रडू आणि कोपऱ्यात बसू आहेत. राजकारणात जशी दोन द्यायची तयारी असते तशीच दोन घ्याची तयारी ठेवायला हवी. ते माझ्या विरोधात कोर्टात गेले आहेत. त्याला माझे वकील कोर्टात उत्तर देतील. आरोप केले आहेत तर त्याचे उत्तर द्या. प्रत्येक गोष्टीला अब्रुनुकसानीचा दावा करत बसले तर त्यांचे आयुष्य कोर्टात जाईल, असा चिमटा संदीप देशपांडे यांनी काढला आहे.

काय होते आरोप?

देशपांडे यांनी 26 जून रोजी पत्रकार परिषद घेऊन कोरोना रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी वापरण्यात आलेल्या मृतदेह बॅगमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. याशिवाय कोरोना संकंट काळात महापालिकेने खरेदी केलेले पीपीई किट, मास्क यामध्येदेखील घोटाळा झाल्याचा आरोप केला होता.

“जेव्हापासून कोरोना संकट सुरु झालं तेव्हापासून महापालिका पीपीई किट, मास्क खरेदी करत आहे. या वस्तू खरेदी कसे होतात? या सर्व गोष्टींकडे लक्ष आहे. महापालिकेच्या भ्रष्टाचारात बरेचसे लोक भरेडले जात आहेत. काही दिवसांपूर्वी महापालिकेने मृतदेह बॅग्स खरेदी केल्या होत्या. त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला. या बॅग्सची किंमत काय ते महापालिकेने ठरवावं. पण कमी गुणवत्तेच्या बॅग्स घेऊन मंबईकरांच्या जीवाशी खेळू नये”, असं देशपांडे म्हणाले होते. “एखादा नवीन माणूस चांगल्या गुणवत्तेची वस्तू महापालिकेला देत असले तर प्रस्थापित कंत्राटदार त्यात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. महापालिकेतील राजकारण्यांना हाताशी धरुन चांगल्या गुणवत्तेच्या वस्तू नाकारुन, कमी गुणवत्तेच्या वस्तू जास्त दरात विकत घेण्याचा घाट घातला जात आहे. पण मनसे तसं होऊ देणार नाही. महापालिकेत खरेदीच्या नावाने हजारो कोटी रुपयांची भ्रष्टाचार सुरु आहे”, असं ही ते म्हणाले होते.

“बीकेसीचा जो डोम उभारला त्यामध्ये लावलेले पंखे भाड्याने लावले आहेत. त्या पंख्याचे 100 रुपये प्रतीपंखा असे भाडे दिले आहेत. नवा पंखा दीड ते दोन हजार रुपयात येतो. महापालिकेने 90 दिवसांचे 9000 हजार भाडे आधीच दिले आहेत. मात्र, तरीही ते पंखे पालिकेच्या मालकीचे नाहीत”, असं सांगतानाच “विशेष म्हणजे हे सर्व करत असताना महापालिकेने कोरोना संकटाच्या नावावर कोणतंही टेंडर काढलं नाही. कोरोना संकटाच्या नावावर लोकांचे लाखो रुपये भ्रष्टाचारात अडकले आहेत. या सर्व प्रकरणात जी लोकं आहेत त्यांची महापालिकेने सखोल चौकशी करावी. या कंत्राटदारांच्या राजकीय लिंक शोधल्या पाहिजेत. कारण त्यामागे पेंग्विन गँग कार्यरत आहे. या सर्व प्रकरणाची तटस्थ व्यक्तीकडून चौकशी व्हावी”, अशी मागणीही त्यांनी केली होती. त्यानंतर सरदेसाई यांनी नोटीस पाठवल्यानंतर असल्या धमक्यांना आम्ही घाबरत नसल्याचं देशपांडे म्हणाले होते.

नितेश राणेंचे आरोप

दरम्यान, सचिन वाझे प्रकरणी कालच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी वरुण सरदेसाई यांच्यावर आरोप केले होते. आयपीएल बेटिंगप्रकरणात वाझेंनी सट्टेबाजांना खंडणी मागितली होती. तर सरदेसाई यांनी वाझेंकडे पैशाची मागणी केली होती, असा आरोप राणे यांनी केला होता. त्यावर सरदेसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन सात दिवसात पुरावे जाहीर करा अथवा माफी मागा, नाही तर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार, असा इशारा सरदेसाई यांनी दिला होता. (varun sardesai filed defamation case against sandeep deshpande)

 

संबंधित बातम्या:

शरद पवारांनीच अनिल देशमुखांना तात्काळ घरी पाठवावं; किरीट सोमय्या यांची मागणी

मुंबईत 30 ते 40 कुत्र्यांवर बलात्कार, निर्लज्ज आरोपी म्हणतो प्राण्यांना आक्षेप नाही, तर गुन्हा कसा?

असल्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही, वरुण सरदेसाईंना संदीप देशपांडेंचा थेट इशारा

(varun sardesai filed defamation case against sandeep deshpande)