‘ज्युनियर महाराष्ट्रश्री’ जिंकलेल्या विरारच्या बॉडीबिल्डरची आत्महत्या

| Updated on: Jan 31, 2020 | 1:59 PM

विरारमध्ये राहणारा बॉडीबिल्डर अली सलोमनी याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

ज्युनियर महाराष्ट्रश्री जिंकलेल्या विरारच्या बॉडीबिल्डरची आत्महत्या
Follow us on

विरार : ‘ज्युनियर महाराष्ट्रश्री’सह अनेक मानाचे किताब जिंकणाऱ्या शरीरसौष्ठवपटूने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बॉडीबिल्डर अली सलोमनी (Virar Body Builder Ali Salomani Suicide) याने विरारमधील राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्य संपवलं.

अली सलोमनी विरार पूर्वेकडील शिवलीला अपार्टमेंटमध्ये राहत होता. गेल्या काही दिवसांपासून तो आर्थिक विवंचनेत असल्याचं म्हटलं जातं. आर्थिक परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या चिंतेतूनच अलीने टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. अलीच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.

अलीने सलोमनी याने आज (शुक्रवार 31 जानेवारी) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घरात कोणी नसताना आत्महत्या केली. गळफास घेऊन अलीने आपलं आयुष्य संपवलं. पत्नी घरी आल्यानंतर तिला अली बेडरुममधील पंख्याला लटकलेला दिसला. तिने आरडाओरडा करुन आजूबाजूच्या लोकांना बोलावून घेतलं.

या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन विरार पश्चिम उप जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.

बॉडीबिल्डर अली सलोमनी याने तीन वेळा ‘वसईश्री’, एकदा ‘दहिसरश्री’ आणि ‘ज्युनियर महाराष्ट्रश्री’ या स्पर्धांचा किताब पटकावला होता. गेल्या अनेक वर्षांपासून अलीने अनेक तरुणांना शरीरसैष्ठ स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले होते. अलीच्या आत्महत्येमुळे बॉडिबिल्डर क्षेत्रातील मुलांसह परिसरावर मोठी शोककळा पसरली आहे.

अलीची आत्महत्या ही आर्थिक विवंचनेतूनच झाली की त्यामागे अन्य काही कारणं आहेत, याविषयी विरार पोलिस अधिक तपास (Virar Body Builder Ali Salomani Suicide) करत आहेत. सध्या तरी विरार पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.