मुंबईत दोन दिवस पाणीबाणी! उद्या ‘या’ विभागांमध्ये पाणीपुरवठा राहणार बंद, तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणी

| Updated on: Jun 06, 2022 | 8:42 AM

जलवाहिनीच्या जोडकामामुळे मुंबईतील एफ दक्षिण विभागातल्या अनेक परिसरामध्ये मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

मुंबईत दोन दिवस पाणीबाणी! उद्या या विभागांमध्ये पाणीपुरवठा राहणार बंद, तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणी
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईतील (Mumbai) एफ दक्षिण विभागातल्या अनेक परिसरामध्ये उद्या पाणीपुरवठा (Water supply) बंद राहणार आहे. या परिसरात मंगळवारी सकाळी दहा वाजेपासून ते बुधवारी सकाळी दहा वाजेपर्यंत असा 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जलवाहिनी जोडकामामुळे हा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. एफ दक्षिण विभागात पाण्याबाबत अनेक समस्या आहेत. तेथील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी जलवाहिनीचे जोडकाम हाती घेण्यात आले आहे. शिवडी बस डेपोसमोर 750 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवर जोडलेली 600 मिलीमीटर आणि 450 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीचा जोड हा 1500 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला देण्यात येणार आहे. यामुळे पाणी अधिक वेगाने येण्यास मदत होणार आहे. या कामासाठी उद्या एफ दक्षिण (F South) विभागातील अनेक परसिरामध्ये सकाळी दहावाजेपासून पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तर उत्तर व दक्षिण विभागातील काही परिसरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद?

उद्या सकाळी दहा वाजेपासून ते परवा सकाळी दहा वाजेपर्यंत एफ दक्षिण विभागातील अनेक परिसरामध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. यामध्ये रुग्णायल विभागात के.ई.एम रुग्णालय, बाई जेरबाई वाडिया रुग्णालय, एम.जी.एम रुग्णालयाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. याचप्रमाणे शिवडी फोर्ट मार्ग, शिवडी कोळी वाडा, गाडी अड्डा या परिसरात देखील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. गोलंजी हिल परिसरातील परळ गाव, गं. द. आंबेकर मार्ग, एकनाथ घाडी मार्ग, परळ गाव मार्ग, भगवंतराव परळकर मार्ग, विजयकुमार वाळींभे मार्ग या परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. अभ्युदय नगर परिसरातील अभ्युदय नगर, ठोकरसी जीवराज मार्ग या भागांचा देखील पाणीपुरवठा उद्या बंद राहणार आहे.

हे सुद्धा वाचा

कोणत्या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा?

जलवाहिनीच्या कामामुळे उद्या शहरातील एफ दक्षिण विभागातील अनेक परिसरामध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. मात्र त्याचबरोबर उत्तर व दक्षिण विभागातील काही परिसरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. लालबाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, डॉ. एस. एस. राव मार्ग, महादेव पालव मार्ग, गॅस कंपनी गल्ली तसेच जगन्नाथ भातणकर मार्ग, बी. जे. देवरुखकर मार्ग, गोविंदजी केणी मार्ग या परिसरात उद्या कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.