VIDEO : मोदी यांनी सांगितले तरच बुलेटवरून उतरणार, महिला सी लिंकवरच भांडली; वांद्रे-वरळी सी लिंकवर काय घडलं?

वांद्रे-वरळी सी लिंकवर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका महिलेने सी-लिंकवर थेट वाहतूक पोलिसांशी हुज्जत घातली आहे. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. ही महिला पोलिसांना धमकावतही होती.

VIDEO : मोदी यांनी सांगितले तरच बुलेटवरून उतरणार, महिला सी लिंकवरच भांडली; वांद्रे-वरळी सी लिंकवर काय घडलं?
women biker
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 26, 2023 | 9:29 AM

ब्रिजभान जैस्वार, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 26 सप्टेंबर 2023 : वांद्रे-वरळी सी लिंकवर एका महिलेने चांगलाच धिंगाणा घातला आहे. एक तर ही महिला बुलेटवरून सी लिंकवर आली. त्यात तिने हेल्मेट घातलेलं नव्हतं. वर तिने वाहतूक पोलिसांनाच सुनवायला सुरुवात केली. वाहतूक पोलिसांना धमकावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांशी हुज्जत घातली. तब्बल 15 मिनिटे हा गोंधळ सी लिंकवर सुरू होता. या महिलेचा आवाज इतका होता की जणू काही तिच पोलिसांची उलटतपासणी घेतेय की काय असं वाटत होतं. या महिलेचा तोरा इतका वाढला की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन लावा. मोदींनी सांगितलं तरच मी बुलेटवरून उतरेल, असं ही महिला म्हणाली. त्यामुळे वाहतूक पोलीसही गांगरुन गेले होते.

वांद्रे-वरळी सी लिंकवर दुपारी हा प्रकार घडला. अचानक एक महिला सी लिंकवर बुलेटवर आणि विना हेल्मेट आल्याने वाहतूक पोलिसांनी तिला अडवलं. या महिलेने रस्त्याच्या मध्येच बुलेट उभी केली. तुम्ही मला का अडवलं? असा उलटा सवाल तिने वाहतूक पोलिसांना केला. माझं नाव नुपूर पटेल आहे. मी आर्किटेक्चर आहे. मला थांबवण्याचं कारण काय? तुम्ही मला अडवू कसे शकता. आता मी इथून जाणारच नाही. आणि बुलेटवरूनही उतरणार नाही. उन्हात उभं करा मी जाणार नाही. माझा तुमच्यावर विश्वास नाही. मी निघणारच नाही. मी गव्हर्नमेंट ऑफ भारत आहे. मी मध्यप्रदेशची आहे. मी आर्किटेक्ट आहे. स्वत:च्या ऑफिसला जात आहे. मला रोखायची तुझी हिमंत नाहीये, अशी अरेरावीची भाषा ही महिला वापरत होती.

मोदींना फोन कर…

या महिलेची अरेरावीची भाषा सुरू असताना वाहतूक पोलीस कंट्रोल रुमशीही संपर्क साधत होते. कंट्रोल रुमला झाला प्रकार सांगत होते. तर दुसरीकडे महिला काही ऐकायला तयार नव्हती. तिचा आवाज वाढतच चालला होता. नोकर नाहीये मी. टॅक्स भरते. या ब्रिजवर उभं राहण्याचा मला अधिकार आहे. मोदींचा फोन आला आणि ते म्हणाले नुपूर गाडी बंद कर तर गाडी बंद करेल. फोन कर मोदींना, असं ती ओरडतच पोलिसांना म्हणाली.

तुला ठोकून जाईल

मला मारण्यासाठी संपूर्ण दुनिया लागलीय. मी गाडी बंद करणार नाही. बसायचं तर पाठी बसा. मला हात लावू नका. हात कापून तुमच्या हातात देईल. माझा तुमच्यावर काडीचाही विश्वास नाही. गाडी बंद करणार नाही
माझ्या गाडीला हात लावण्याची तुमची हिंमत कशी होतेय, असं सांगतानाच आता मी पाच मिनिटे थांबेल. 1 वाजून 5 मिनिट होताच तुला ठोकून जाईल, अशी धमकीही या महिलेने दिली. त्यामुळे वाहतूक पोलिसांची चांगलीच भंबरेी उडाली होती.

महिलेविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान, वाहतूक पोलिसांनी कारवाई करत या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. तिच्या विरोधात भादंवि कलम 279 (बेदरकारपणे गाडी चालवणे) आणि कलम 353 (सरकारी कामात अडथळा आणणे) तसेच मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तिची बुलेट देखील जप्त करण्यात आली आहे.