
आगामी महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सध्या राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये दिग्गज नेत्यांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यात निष्ठावंत कार्यकर्त्यांपेक्षा आपल्याच वारसदारांना प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक नेते आपल्या मुलांसाठी आणि निकटवर्तीयांसाठी सुरक्षित रणांगण तयार करत आहेत. यासाठी अनेक बड्या नेत्यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. यामुळे घराणेशाहीच्या चर्चांना पुन्हा एकदा जोर मिळाला आहे.
कोल्हापुरात प्रामुख्याने प्रभाग क्रमांक ३ कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या ठिकाणी महाडिक आणि लाटकर यांच्यात काट्याची टक्कर होण्याची शक्यता आहे. भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक हे प्रभाग क्रमांक ३ मधून चाचपणी करत आहेत. महाडिक कुटुंबाची राजकीय ताकद पाहता हा प्रभाग चर्चेत आला आहे. तर याच प्रभागातून २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील कोल्हापूर उत्तरचे उमेदवार राजेश लाटकर यांनीही रस दाखवला आहे. जर लाटकर रिंगणात उतरले, तर कृष्णराज महाडिक विरुद्ध राजेश लाटकर अशी हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळू शकते.
कोल्हापूर उत्तरचे विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर यांचे पुत्र ऋतुराज क्षीरसागर प्रभाग क्रमांक ७ मधून नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाले आहेत. कोल्हापूर उत्तरच्या माजी आमदार जयश्री जाधव आणि दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांचे सुपुत्र सत्यजित जाधव आपल्या आई-वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी प्रभाग क्रमांक १८ मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये अद्याप युतीची अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आपल्या नातेवाईकांसाठी प्रभागांची बांधणी सुरू केली आहे. आमदार संजय शिरसाट यांची मुलगी हर्षदा शिरसाट आणि मुलगा सिद्धांत शिरसाट हे निवडणुकीसाठी सक्रिय झाले आहेत. आमदार प्रदीप जैस्वाल यांचा मुलगा ऋषिकेश जैस्वाल यानेही प्रभागात लक्ष केंद्रित केले आहे. तसेच माजी आमदार किशन तनवाणी यांचा मुलगा चंदू तनवाणी निवडणूक लढण्याची शक्यता आहे. माजी महापौर नंदू घोडेले स्वतः आणि त्यांच्या पत्नी अनिता घोडेले निवडणुकीसाठी इच्छूक आहेत.
माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांचे चिरंजीव हर्षवर्धन कराड निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे. आमदार संजय केणेकर यांचा मुलगा हर्षवर्धन केणेकर यांचीही चाचपणी सुरू आहे. बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांच्या पत्नी शीतल कुचे याही इच्छुक आहेत.
तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे बंधू राजेंद्र दानवे सक्रिय झाले आहेत. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा पुतण्या सचिन खैरे आणि मुलगा ऋषिकेश खैरे हे देखील निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहेत. या सर्व घडामोडींमुळे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी मिळणार की पुन्हा एकदा नेत्यांची मुलंच बाजी मारणार, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.