मनसे, ठाकरे एकत्र येताच आता वंचितनेही घेतला युतीबाबत मोठा निर्णय, नेमकं काय ठरलं?

राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, या पार्श्वभूमीवर युती आणि आघाड्या संदर्भात बोलणी सुरू आहेत, आता वंचित बहुजन आघाडीने देखील युतीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

मनसे, ठाकरे एकत्र येताच आता वंचितनेही घेतला युतीबाबत मोठा निर्णय, नेमकं काय ठरलं?
प्रकाश आंबेडकर
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 24, 2025 | 8:09 PM

राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. शिवसेना ठाकरे गट आणि  मनसेकडून अधिकृतरित्या युतीची घोषणा करण्यात आली आहे. तब्बल 18 वर्षांनी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीकडून देखील युतीसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.  भाजप सोडून कोणत्याही पक्षासोबत युती करा, अशा सूचना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाच्या सर्व जिल्हाध्यक्षांना दिल्या आहेत. तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी ही चांगली गोष्ट असून, त्यांचं स्वागत आहे, असं म्हटलं.

नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर? 

आगामी महापालिका निवडणुकीला कसं सामोरं जाणार? याबाबत आता वंचित बहुजन आघाडीने आपली दिशा स्पष्ट केली आहे.  भाजप सोडून कोणासोबतही युती करा, दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना आणि काँग्रेस बरोबर युती केली तर चालेल अशा सूचना प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पक्षाच्या सर्व जिल्हाध्यक्षांना दिल्या आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले की,  या सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे भाजपा काही ठिकाणी त्यांच्या मित्रांबरोबर चालली आहे, तर काही ठिकाणी युती करणार नाही. काँग्रेस सुद्धा  काही ठिकाणी राष्ट्रवादी सोबत चालली आहे, काही ठिकाणी नाही. तीच परिस्थिती शिवसेनेची आहे.  त्यामुळे एक पॉलिसी अशी नाही,  ज्या महापालिका आहेत तिथल्या अध्यक्षांना युतीसंदर्भात अधिकार देण्यात आले आहेत.  त्यांनी कोणासोबत युती करता येईल याची चाचपणी करावी, मात्र त्यासाठी अट एकच आहे, भाजपसोबत युती करायची नाही, असं यावेळी आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

मनसे-ठाकरे गट युतीवर प्रतिक्रिया 

दरम्यान आज शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती झाली आहे, यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी या युतीचं स्वागत केलं आहे. ही चांगली गोष्ट आहे, दोघांचं स्वागत असं यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.