एटीएम मशीन अडकली म्हणून मदत मागितली, घरी पोहोचताच मोबाईलवरचे मेसेज पाहून पायाखालची जमीनच सरकली, नेमकं काय घडलं?

नागपूरच्या बजाजनगर भागात एटीएममध्ये मदतीच्या बहाण्याने निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याचे कार्ड बदलून ४८ हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

एटीएम मशीन अडकली म्हणून मदत मागितली, घरी पोहोचताच मोबाईलवरचे मेसेज पाहून पायाखालची जमीनच सरकली, नेमकं काय घडलं?
bank ac
| Updated on: Jun 02, 2026 | 9:48 AM

एटीएम सेंटरमध्ये ज्येष्ठ नागरिकांना आणि गरजू लोकांना मदतीचा बहाणा करून त्यांचे एटीएम कार्ड बदलवून फसवणूक करणाऱ्या टोळ्या पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत. नागपुरातील बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला मदतीचा बहाणा करून अज्ञात भामट्याने तब्बल ४८ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी बजाजनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या पुढील तपास सुरू केला आहे.

नक्की काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार नरेंद्र सुखदेवे हे निवृत्त शासकीय सेवक आहेत. ते आपल्या वैयक्तिक कामासाठी बजाजनगर भागातील एका एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. एटीएम मशीनमध्ये काही तांत्रिक अडचण किंवा प्रक्रियेत गुंतागुंत निर्माण झाल्यामुळे सुखदेवे यांना त्यांचा व्यवहार पूर्ण करता येत नव्हता. ते प्रयत्न करत असताना एटीएम सेंटरमध्ये दबा धरून बसलेल्या एका अज्ञात आरोपीने सुखदेवे यांना मदतीची ऑफर दिली. मी तुम्हाला पैसे काढून देतो, असे म्हणत त्याने सुखदेवे यांचा विश्वास संपादन केला.

चलाखीने जाणून घेतला पिन आणि बदलले कार्ड

यानंतर मदतीचा बहाणा करत असताना आरोपीने अतिशय चलाखीने नरेंद्र सुखदेवे यांच्या एटीएमचा पिन नंबर (PIN) पाहून घेतला. त्यानंतर मशीनमधून पैसे निघत नसल्याचे नाटक करत, आरोपीने हातातील हातचलाखी दाखवून सुखदेवे यांचे मूळ एटीएम कार्ड स्वतःकडे ठेवून घेतले. त्यांना दुसऱ्याच कोणत्यातरी बँकेचे बनावट किंवा बंद पडलेले एटीएम कार्ड हातात सोपवले. सुखदेवे यांना या हातचलाखीचा सुगावा लागला नाही. ते तिथून निघून गेले.

घरी परतताच मेसेज आला अन्…

नरेंद्र सुखदेवे हे घरी परतल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर बँक खात्यातून पैसे काढण्यात आल्याचे मॅसेज आले. त्यांनी तपास केला असता, त्यांच्या खात्यातून दोन टप्प्यांत पैसे काढण्यात आल्याचे उघड झाले. या भामट्याने ८ तारखेला सुखदेवे यांच्या खात्यातून ४० हजार रुपये आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच ९ तारखेला उर्वरित ८ हजार रुपये असे एकूण ४८,००० रुपये लंपास केले होते.

यानतंर सुखदेवे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने बजाजनगर पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या एटीएम सेंटरमधील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत असून आरोपीचा शोध घेत आहेत.

Follow Us