विद्यार्थ्याला मुलींचे कपडे घालायला सांगितले अन्…नागपुरातील कॉलेजमध्ये भयंकर प्रकार उघड
नागपुरातील कॉलेजमध्ये भयंकर प्रकार उघड झाला आहे. नागपुरात एका विद्यार्थ्यांची रॅगिंग झाल्याचं समोर आलं आहे.

नागपुरातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नागपूरच्या शासकीय दंत चिकित्सा महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या वसतिगृहात रॅगिंगचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. 19 वर्षीय विद्यार्थ्याला मुलींचे कपडे घालून सहकारी विद्यार्थ्याला प्रपोज करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कपडे काढणे, कोंबडा बनवणे आणि उष्टे अन्न खाण्यास भाग पाडल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलल करण्यात आला आहे.
नागपूर पोलिसांनी आयुष सी. आर., नरेंद्र सिंह, अमन खान आणि एका अनोळखी विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम २९६, १२६(२), ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक अधिनियम १९९९ च्या कलम ४ अंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे. महाविद्यालयाच्या प्राथमिक चौकशीनंतर तीन वरिष्ठ विद्यार्थ्यांना वसतिगृहातून बाहेर काढले आहेत. अजनी पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
तक्रारदर विद्यार्थी हा उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्याच्या कमहरिया या भागातील रहिवासी आहे. नीट परीक्षेत त्याने 552 वा क्रमांक मिळवला. त्यानंतर त्याने नागपुरात जीडीसीसीमध्ये बीडीएस (BDS) डिग्रीसाठी प्रवेश घेतला होता. तक्रारदार विद्यार्थी हा 26 ऑक्टोबर रोजी वसतिगृहात राहायला आला. त्यानंतर त्याच रात्री साडेआठच्या सुमारास रूम क्रमांक 104 मध्ये काही वरिष्ठ विद्यार्थी घुसले. तक्रारदार विद्यार्थ्याने पुढे सांगितलं की, स्वत:ला क्लास मॉनिटर म्हणवणाऱ्या विद्यार्थ्याला मला टोपी काढायला सांगितली. त्यानंतर डोके खाली घालण्यास सांगितले. त्यानंतर इतरांना कोंबडा होण्यास आणि कपडे काढण्यास भाग पाडले. अश्लील शेरेबाजी करून नको त्या जागी स्पर्श केला. दोन वरिष्ठांनी मुलींचे कपडे घालायला सांगितले. त्यानंतर दुसऱ्या विद्यार्थ्याला प्रपोज करायला लावला. दारूची बाटली आणणे, खोली साफ करणे आणि अश्लील व्हिडिओ दाखवले. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिली.’
तक्रारदार विद्यार्थ्याने ईमेलद्वारे महाविद्यालय प्रशासनाला तक्रार दिली होती. त्यावेळी तक्रारीत अँटी रॅगिंग समिती आणि पथकाकडून चौकशीची मागणी केली होती. तसेच हॉस्टेलचे सीसीटीव्ही फुटेज मागितले. त्यानंतर कॉलेज प्रशासनाने टाळाटाळ केल्याचा आरोप विद्यार्थ्याच्या मावशीने केला आहे. या प्रकरणी युजीसीची अँटी रॅगिंग हेल्पलाईन, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडेही तक्रार करण्यात आलीये. एका खोलीत दोन ते तीन विद्यार्थ्यांची व्यवस्था असल्याचं सांगितलं जातं. मात्र प्रत्यक्षात एका खोलीत सुमारे 14 विद्यार्थी राहत असल्याचा दावा तक्रारदार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी केलाय.