
आपण अनेकदा सोशल मीडियावर विविध विचित्र बांधकामांचे व्हिडीओ पाहत असतो. कधी दोन इमारतीतून गेलेली मेट्रो, कधी पूलाच्या मध्यभागी असलेले घरं, तर कधी 90 अंशात बांधलेला पूल हे सर्व पाहिल्यानंतर आपल्याला अनेकदा हसू येत. हे अजब कारनामे बहुतांश वेळा परदेशात घडलेले असतात. पण आता असाच काहीसा प्रकार आपल्या महाराष्ट्रात घडल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रातील नागपूरमध्ये एक असा उड्डापूल तयार करण्यात आला आहे, जो चक्क एका व्यक्तीच्या घराच्या बाल्कनीला लागल्याचे दिसत आहे. याचा एक व्हिडीओही समोर आला आहे.
नागपूरच्या अशोक चौकात सध्या इंदोरा-दिघोरी उड्डाणपुलाचे बांधकाम सुरु आहे. या उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी ९९८ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. मात्र आता नागपूरमधील अशोक चौकातील इंदोरा-दिघोरी उड्डाणपुलाच्या एक अजब प्रकार समोर आला आहे. अशोक चौकातील या उड्डाणपुलाच्या एक कोपरा प्रवीण पत्रे यांच्या घराच्या बाल्कनीला घासून गेल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्या घराची बाल्कनी आणि उड्डाणपुलाचे अंतर इतके कमी आहे की ते जवळजवळ एकमेकांना चिकटल्याचे दिसत आहे. हा धक्कादायक प्रकार पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. तसेच हा प्रकार पाहून अनेक प्रश्न निर्माण केले जात आहेत.
या सगळ्या प्रकारावर घरमालक प्रवीण पत्रे यांनी मला काहीही अडचण नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या घरामुळे उड्डाणपुलाच्या कामात अडथळा येत नाही. यामुळे आम्हाला कोणताही त्रास नाही, असे प्रवीण पत्रे यांनी म्हटले आहे. त्यांची ही प्रतिक्रिया ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. तर दुसरीकडे नागपूर महानगरपालिकेने या प्रकरणी महत्त्वाचा खुलासा केला आहे. प्रवीण पत्रे यांनी त्यांच्या घरासाठी कोणताही अधिकृत बांधकाम परवाना घेतलेला नाही. त्यामुळे त्यांचे हे घर अनधिकृत बांधकामाच्या श्रेणीत येते, असे नागपूर महापालिकेने म्हटले आहे.
याप्रकरणी त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) या घराला अतिक्रमण मानून ते हटवण्याची मागणी महापालिकेकडे केली आहे. मात्र, घरांचे बांधकाम अनधिकृत असल्याने नुकसान भरपाईबाबत काही तरतूद नाही, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. या विचित्र बांधकामामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान या उड्डाणपुलावरून धावणाऱ्या वाहनांच्या वेगामुळे आणि घराच्या अगदी जवळून जाणाऱ्या उड्डापुलामळे अपघाताचा धोका वाढू शकतो, अशी भीती लोकांना वाटत आहे. भविष्यात या भागात एखादा अपघात झाल्यास, त्याला जबाबदार कोण, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. सध्या नागपुरातील हा उड्डाणपूल सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. इंजिनिअरिंगचा अजब नमुना अशा कमेंट या बातमीवर पाहायला मिळत आहेत.