
काळ आला होता पण वेळ आली नव्हती, ही म्हण आपण अनेकवेळा ऐकली तर असेल पण नागपूर जिल्ह्यातील लोकांना या म्हणीचा प्रत्यक्ष प्रत्यय आला. संपूर्ण घर शोकाकुल होतं, अंत्यसंस्काराची तयारीही झाली होती. मात्र तेवढ्यात तिरडीवर ठेवलेल्या वृद्ध महिलेच्या पायाची बोटं हलू लागल्याने, समोरच्या लोकांचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. नागपूर जिल्ह्यातील गंगाबाई सावजी साखरे या 103 वर्षांच्या आज्जीला जीवनदान मिळाल्याने हाँ सगळीकडे चर्चेचा विषय ठरला आहे. सोशल मीडियावरही ही घटना व्हायरल झाली असून सर्वत्र त्याचीच चर्चा आहे. जिच्या मृत्यूमुळे घरातल्यांच्या डोळ्यात दु:खाश्रू होते, तिथे अचानक वातावरण बदललं आणि उपस्थित कुटुंबियांच्या डोळ्यात आस पण चेहऱ्यावर हसू अशी परिस्थिती उद्भवली.
घरच्यांना अश्रू अनावर
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील चारगाव येथे हा प्रकार घडला. तिथे राहणाऱ्या गंगाबाई सावजी साखरे या 103 वर्षांच्या आज्जींनी यमराजाला पिटाळून लावलं. आणि त्या मृत्यूच्या दाढेतून परत आल्या. गंगाबाई या गेल्या दोन वर्षांपासून आजारी होत्या. सोमवारी त्यांचे निधन झाल्याची बातमी पसरली. अचानक त्यांची हालचाल बंद झाली आणि श्वास थांबल्याने त्या गेल्या असं सर्वांना वाटलं. त्यामुळे घरचे शोकाकुल झाले, त्यांना अश्रू अनावर झाले.
त्याच्या निधनाची बातमी सर्वांना कळवण्यात आली. इतर कुटंबिय, नातेवाईक, परिचित यांनी त्यांच्या घरी धावही घेतली. काही शोकमग्न लोकांनी भावपूर्ण श्रद्धांजलीचे मेसेजही सोशल मीडियावर टाकले. इकडे गंगाबाई यांच्या घरी त्यांच्या अंत्ययात्रेची सर्व तयारी करण्यात आली. श्वास थांबल्याने त्यांच्या कानात कापूस वगैरे घालण्यात आला. त्यांचा देह तसाच तिथे निश्चल अवस्थेत होता.
दु:खद वातावरण क्षणात बदललं अन्
मात्र अंत्यविधीची तयारी सुरु असतानाच अचानक आज्जीने, गंगाबाई यांनी त्यांच्या पायाचे बोटं हलवले. आधी कोणाचा विश्वासच बसेना, पण त्यांच्या पायाची पुन्हा हालचाल झालीय सर्वांना निरखून बारकाईने पाहिल्यावर आज्जी गेल्या नाहीतर तर जिवंत असल्याचे नातेवाईकांना कळले आणि सर्वांनाच एक सुखद धक्का बसला. विशेष म्हणजे 13 जानेवारी हा आज्जींचा वाढदिवस असतो. त्यामुळे अंत्यंविधीसाठी आलेल्या नातेवाईकांनी गंगाबाई साखरे यांचा (दुसऱ्या दिवशी असलेला) वाढदिवस आधीच साजरा केला. या घटनेची फक्त नागपुरात नव्हे सर्वत्र चर्चा सुरू आहे.