
निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अटकेला घाबरले होते. मातोश्रीवर येऊन ते रडले होते. महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची विनंती करत होते, असा दावा माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांचा हा दावा खरा असल्याचं म्हटलं आहे. एकनाथ शिंदे माझ्याकडेही आले होते. आघाडीतून बाहेर पडण्याची विनंती करत होते. मला अटकेची भीती वाटतेय असं म्हणत होते, असा गौप्यस्फोट करतानाच एकनाथ शिंदे यांचं शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
आदित्य ठाकरे जे बोलत आहेत ते सत्य आहे. एकनाथ शिंदे माझ्याही घरी आले होते. आदित्य ठाकरे जे म्हणाले तेच शिंदे यांनी मला सांगितलं होतं. मला तुरुंगात जायचं नाही. तुम्ही काही करा. तुम्ही आघाडी तोडा, अशी गयावया शिंदे यांनी केली होती. मी म्हटलं तुम्ही तुरुंगात का जाणार आहात? तुम्हाला तुरुंगात का पाठवणार आहेत? पक्षाने सर्व दिलं तर पक्षासोबत राहिलं पाहिजे. देशात दमन सुरू आहे. आपण चुकीचं काही केलं नाही तर आपण घाबरण्याची गरज नाही, असं मी त्यांना सांगितलं. पण तरीही ते म्हणत होते, मला तुरुंगात टाकण्याची भीती वाटते. असे अनेक लोक आहेत ते घाबरत होते. आज ते तिकडे आहेत. काय बोलणार? असं संजय राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी मातोश्रीवर सांगितलं असेल तर सत्य आहे. माझ्या बंगल्यावरही त्यांनी अशीच चर्चा केली होती. मी त्यांना वारंवार सांगत होतो, आपण लढणारे आहोत. आपण प्रसंगाला सामोरे जाऊ. मला अटक करायला आले तर थांबू नका, मला अटक करा असं मी कारवाई करणाऱ्यांना सांगेन असंही मी त्यांना म्हणालो होतो. शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं असा शिवसैनिक असू शकत नाही. शिवाजी महाराजांच्या दाढीत शौर्य होतं. ते शौर्य तुम्ही दाखवायला हवं होतं. तुम्हाला दाढी असेल तर. पण तुम्ही घाबरून गेलात. त्यावेळी जे आमदार आणि खासदार निघून गेले. त्यांच्यावर ईडीच्या कारवाया सुरू होत्या. त्यामुळे ते घाबरूनच गेले. आज राष्ट्रवादीबाबत तेच होत आहे, असंही ते म्हणाले.
सर्वांना ईडीची भीती दाखवली जात आहे. अशा संकटात आपण उभे राहिलो तरच तो नायक ठरेल. डरो मत हा मंत्र महत्त्वाचा आहे. मी इथूनच भगवं उपरणं उडवत गाडीत बसलो होतो. मी अजिबात घाबरलो नाही. मला बनावट प्रकरणात टाकण्यात आलं. मी काहीच केलं नसताना मी तुरुंगात गेलो. ज्यांनी काहीच केलं नसेल तर त्यांनी बेडरपणे सामोरे जायला हवं, असं राऊत म्हणाले.