Mohan Bhagwat: ‘कधीकाळी फटाके हवा शुद्ध करायचे, दूषित नाही’, आता सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याची भर, म्हणाले काय?
RSS Chief Mohan Bhagwat on Firecracker: सध्या दिवाळीतील फटक्यांच्या प्रदूषणाचा विषय ऐरणीवर आला आहे. अनेक शहरातीलच नाही तर गावातील हवेची गुणवत्ता ढासळली आहे. त्याचवेळी यावरून मोठ्या नेत्यांच्या वक्तव्याने चिंतेची, संतापाची लड लावली आहे.

RSS Chief Mohan Bhagwat on Firecracker: पूर्वीच्या काळात फटाके हे रसायनविरहित, रसायनांशिवाय तयार करण्यात येत होते. त्यांच्या धुरामुळे वातावरणातील घातक कीटक नष्ट होतं आणि हवा शुद्ध होत असे, असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला आहे. नागपूर य़ेथे महेश्वरी पंचायतीच्या दिवाळी मिलन कार्यक्रमात ते बोलत होते. सण, परंपरा आणि त्यामागील वैज्ञानिक कारणमीमांसा त्यांनी केली. सण हे भारतीय समाजाचा अविभाज्य भाग आहे. काही लोक ते बंद करण्याचा कितीही प्रयत्न करत असले तरी सण कधीही बंद होणार नाहीत, असा खोचक टोलाही भागवत यांनी लगावला.
सणांमागील शास्त्रीय कारणमीमांसा
या कार्यक्रमात हिंदू संस्कृतीतील आणि कृषी परंपरेशी आधारीत सण उत्सवावर सरसंघचालकांनी प्रकाश टाकला. जुन्या काळात फटाके वापरले जात. त्यामागे काही ठोसं कारणं होती. गाईचे तूप आणि तेलाचे दिवे लावल्यामुळे वातावरणात एका प्रकारची शुद्धता निर्माण व्हायची. वातावरण पवित्र राहण्यासोबतच आपल्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचे विज्ञान त्यामागे असल्याचे सरसंघचालक म्हणाले.
दिवाळी जागतिक स्तरावर व्यापक
दिवाळी आता भारतापुरती मर्यादित राहिली नाही. पूर्वी हा सण केवळ आपल्याच देशात साजरा व्हायचा. आता अमेरिका, ब्रिटनच्या संसदेतही दिवाळी साजरी करण्यात येते. दानधर्म करणे आणि प्रत्येक नागरिकाने आनंदात सहभागी होणे ही आपली संस्कृती असल्याचे ते म्हणाले. जगभरात भारतीय संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित होत आहे. समाजाचे आणि सणाचे नियम हे सर्वांच्या कल्याणासाठी असतात. आपल्या हातून घडणाऱ्या चुका ओळखणे आणि त्यात सुधारणा करणे, सणांची शुद्धता जपणे ही आपली जबाबदारी असल्याचे भान ही मोहन भागवत यांनी यावेळी करून दिले.
योगी आदित्यनाथ म्हणाले काय?
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हवेच्या प्रदूषणावर मत व्यक्त केलं. दिवाळीत फटक्यांमुळे धूर आणि प्रदूषण वाढत असल्याच्या तक्रारीवर त्यांनी म्हणणे मांडले. हवेच्या गुणवत्तेची कसली चिंता करता? ती आपोआप सुधारेल, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण हे तात्पुरत्या स्वरूपाचे असते आणि ते कायमस्वरूपी नसते, असे मत त्यांनी मांडले.