महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या भूकंपाच्या हालचाली? ‘त्या’ 5 मंत्र्यांना खरंच डच्चू? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात…

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्याच्या घडीला पडद्यामागे काय घडामोडी घडत आहेत त्याला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. कारण एकीकडे कल्याणमध्ये शिवसेना आणि भाजपात मोठा वाद उफाळला आहे. वरिष्ठांच्या मध्यस्थीनंतरही वाद शमताना दिसत नाहीय. तर दुसरीकडे शिवसेनेच्या 5 मंत्र्यांना डच्चू दिला जाणारच्या चर्चांनी जोर धरला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या भूकंपाच्या हालचाली? त्या 5 मंत्र्यांना खरंच डच्चू? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jun 12, 2023 | 3:04 PM

नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात काय घडामोडी घडतात ते पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी दोन दिवसांपूर्वीच मोठा दावा केला होता. आगामी काळात शिवसेनेच्या 5 मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार असल्याचं खडसे यांचं म्हणणं आहे. या पाच मंत्र्यांच्या कामकाजावर भाजपचे दिल्लीतील वरिष्ठ नेते नाराज आहेत. त्यामुळे या नेत्यांचा राजीनामा घेण्यास सांगितलं जाणार असल्याचा दावा खडसेंनी केला होता. त्यानंतर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील तसाच काहीसा दावा केला आहे. त्यांनी शिवसेनेच्या 4 मंत्र्यांना येत्या मंत्रिमंडळ विस्तारात डच्चू दिला जाणार असल्याचा दावा केला. या दाव्यांव आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली भूमिका मांडली आहे.

“भारतीय जनता पक्षाचा मी 32 वर्षांपासून कार्यकर्ता आहे. भाजप पक्ष कोणाच्या अधिकारात हस्तक्षेप करेल, असं मला वाटत नाही. कुणाला मंत्री करायचं, कुणाला नाही ठेवायचं हे अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आहेत. त्यांच्या पक्षात कुणाला मंत्रीपदावरुन काढायचं हा त्यांचा अधिकार आहे. भाजप कधीच नाक खुपसत नाही. आम्ही त्यांना कशाला सल्ला द्यायचा? आमचं युतीचं सरकार आहे. त्यामुळे भाजपचा कोण मंत्री व्हावं, कोण नाही हे भाजप ठरवेल, शिंदे त्यांच्या पक्षाचं ठरवतील”, असं बावनकुळे यांनी सांगितलं.

‘आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण व्हावी यासाठी…’

“हे चुकीचं नरेटिव्ह भाजपचं नाही. आमच्या आणि शिवसेनेच्या आमदारांमध्ये धास्ती वाढली पाहिजे, आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण व्हावी यासाठी कुणीतरी ही गाजराची पुंगी सोडली आहे”, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

‘आळंदीच्या घटनेवर राजकारण नको’

आळंदीत जो काही प्रकार घडला त्यावरबी चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. “महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांना आवाहन केलं आहे की, याचं राजकारण करू नका. मला वाटतं यात आणखी काही नवीन गोष्टी बोलायची गरज नाही. मागच्या वेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी अशीच घटना झाली होती. ज्यांना राजकारण करायचंय त्यांनी राजकारण करावे. कारण फडणवीस यांनी काल घटनेबद्दल पूर्ण स्पष्टीकरण दिलेलं आहे. सरकार आपल्या पद्धतीने कारवाई करत आहे”, असं बावनकुळे म्हणाले.

“विरोधकांना राजकारण करायचे असेल तर त्यांनी करावे. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री होते तेव्हा यापेक्षाही भयंकर घटना घडली होती. त्या ठिकाणी पुन्हा काही होऊ नये म्हणून काही सूचना आणि व्यवस्था उभ्या केल्या. सरकारकडून आवाहन करण्यात आलंय की, विरोधकांनी राजकारण करू नये”, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.