Dr Babasaheb Ambedkar : खरेखुरे महानायक… अर्थशास्त्रातील गुरू… नोबेल पुरस्कार विजेत्यांनी काय म्हटलं होतं बाबासाहेबांबद्दल? हे माहीतच हवं!
नोबेल पुरस्कार विजेत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आणि कार्याचा गौरव केला आहे. अर्थशास्त्राचे गुरु, समानतेचे पुरस्कर्ते, आणि सामाजिक बदलाचे शिल्पकार म्हणून ते आजही अनेकांना प्रेरणा देतात. गुन्नार मायर्डल, दलाई लामा, नेल्सन मंडेला, अमर्त्य सेन यांसारख्या दिग्गजांनी आंबेडकरांच्या दूरदृष्टीचे आणि योगदानाचे कौतुक केले आहे, जो त्यांचा जागतिक प्रभाव दर्शवतो.

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो लोक मुंबईत दाखल झाले आहेत. प्रत्येक जाती, धर्माचा व्यक्ती बाबासाहेबांना नव्याने समजून घेण्यासाठी दादर चैत्यभूमीवर आला आहे. बाबासाहेबांचे विचार, त्यांचे कार्य आजही लाखो लोकांना प्रेरणा देतं. केवळ देशातीलच नव्हे तर देशाबाहेरच्या लोकांनाही बाबासाहेबांचे विचार प्रेरणा देत आहेत. जगातील ज्या ज्या महापुरुषांच्या विचारांचं गारूड आजही जगावर कायम आहे, अशा महापुरुषांपैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक आहेत. त्यांच्या विचाराने केवळ राजकारणीच नव्हे तर अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, मानववंश शास्त्रज्ञ, प्राध्यापक वर्ग, विविध क्षेत्रातील तज्ज्ञांसह नोबल पुरस्कार विजेतेही प्रभावित झालेले आहेत. नोबल पुरस्कार विजेत्यांनी तर आंबेडकरांवर भरभरून भाष्य केलं आहे. त्याचाच घेतलेला हा आढावा.
गुन्नार मायर्डल –
गुन्नार मायर्डल (1898-1987) हे एक स्वीडिश अर्थतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ आणि राजनीतिज्ञ होते. 1974मध्ये त्यांना अर्थशास्त्रातील कामगिरीबद्दल नोबेल पुरस्कार मिळालेला आहे.
गुन्नार मायर्डल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अत्यंत गौरवपूर्ण उद्गार काढले आहेत. येणारी पिढी डॉ. आंबेडकरांना स्वतंत्र भारताला दिशा देणारा एक महान भारतीय म्हणून ओळखेल. आंबेडकरांच्या स्मृती संपूर्ण जगात कायम अमर राहतील, असं गुन्नार म्हणाले होते.
दलाई लामा –
14 वे दलाई लामा (जन्म 6 जुलै 1935) हे प्रसिद्ध तिबेटीयन बौद्ध धर्म गुरू आहेत. तसेच तिबेटचे माजी प्रमुखही आहेत. चीनने तिबेटवर कब्जा केल्यानंतर दलाई लामा भारतात आले. दलाई लामा यांना 1989मध्ये शांततेचा नोबल पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे.
दलाई लामा आपल्या प्रवचनात नेहमीच डॉ. आंबेडकरांचा उल्लेख करतात. बाबासाहेब हे एक महान नायक आहेत. त्यांनी भारतात बौद्ध धर्माचं पुनरुज्जीवन करण्यात मोठं योगदान दिलं आहे. समानतेचा आग्रह धरणारे आणि जातीवर आधारीत भेदभाव समूळ नष्ट करण्यासाठी लढा देणारे बाबासाहेब महान नेता होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या आदर्शांवर आणि शिकवणुकीवर मार्गक्रमण करणं हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल, असं दलाई लामा यांनी म्हटलं आहे.
नेल्सन मंडेला –
नेल्सन मंडेला (जन्म 1918) हे दक्षिण आफ्रिकेतील साम्राज्यवाद, गरिबी आणि वंशभेदाचं उच्चाटन करण्यासाठी लढा देणारे महान नेते होते. तसेच ते दक्षिण आफ्रिकेचे पहिले राष्ट्रपती होते. त्यांना 1993मध्ये नोबल शांती पुरस्कार मिळालेला आहे.
12 एप्रिल 1990 रोजी भारताच्या संसद भवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं. यावेळी नेल्सन मंडेला यांनी बाबासाहेबांबद्दल आपले विचार मांडले होते. आपण बाबासाहेबांच्या जीवनकार्यापासून प्रेरणा घेऊन त्यावर आधारीत आपला संघर्ष सुरू ठेवू. बाबासाहेबांनी ज्या लढ्याद्वारे समाजात परिवर्तन घडवून आणलं, त्या लढ्यातूनच आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे, असं नेल्सन मंडेला म्हणाले होते.
डॉ. अमर्त्य सेन –
अमर्त्य कुमार सेन (जन्म 1933) हे एक भारतीय अर्थतज्ज्ञ आणि दार्शनिक आहेत. 1998मध्ये त्यांना अर्थशास्त्राचा नोबल पुरस्कार मिळाला. त्यांनी बाबासाहेब हेच माझ्या अर्थशास्त्रातील गुरू आहेत, असं म्हटलं होतं. अमर्त्य सेन यांच्यावर बाबासाहेबांचा प्रचंड प्रभाव आहे. ते बाबासाहेबांना आपला गुरू मानतात. त्यामुळेच त्यांच्या असंख्य भाषणात बाबासाहेब आणि बौद्ध धर्माचा नेहमीच उल्लेख आला आहे.
बाबासाहेब माझे अर्थशास्त्रातील गुरू आहेत. ते दलित, शोषित आणि वंचितांचे खरेखुरे आणि प्रसिद्ध नायक आहेत. त्यांना आजपर्यंत जो सन्मान मिळालाय, त्यापेक्षाही अधिक सन्मान मिळण्यास ते पात्र आहेत. त्यांच्यावर असंख्य टीका केली जाते. पण जी टीका करण्यात येते, त्यात आणि वास्तवात काहीही फरक नाही. अर्थशास्त्राच्या क्षेत्रातील त्यांचं योगदान प्रभावशाली आहे. त्यामुळेच ते कायम स्मरणात राहतील, असं अमर्त्य सेन यांनी म्हटलंय.
बराक ओबामा –
बराक ओबामा (जन्म 1961) हे अमेरिकेचे 44 वे राष्ट्रपती होते. त्यांना 2009मध्ये शांततेचा नोबल पुरस्कार मिळालेला आहे. 8 नोव्हेंबर 2010 रोजी ओबामा दिल्लीत आले होते. यावेळी त्यांनी भारतीय संसदेला संबोधित केलं होतं. तुम्ही कोण आहात आणि कुठून आलात याने काही फरक पडत नाही. प्रत्येक व्यक्ती आपल्या क्षमतेचा उपयोग करू शकतो. बाबासाहेब आंबेडकर हे संघर्ष करून यशाच्या शिखरावर पोहोचले. त्यांनी भारताचं संविधान लिहिलं आणि सामान्य लोकांना त्यांचे अधिकार दिले, असं बराक ओबामा म्हणाले होते.
कैलाश सत्यार्थी –
कैलाश सत्यार्थी (जन्म 1954) हे एक भारतीय सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी बाल मजुरीविरोधात आवाज उठवला होता. शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचं ते नेहमीच समर्थन करतात. त्यांना 2014मध्ये नोबल शांती पुरस्कार मिळाला होता.
डॉ. आंबेडकर हे एक महुसारख्या छोट्याश्या गावात जन्मलेला प्रकाशाचा पुंजका आहेत. त्यांच्या हा प्रकाशाचा पुंजका एवढा मोठा झालाय की त्याचा प्रकाश आता कशानेही झाकता येणार नाही. ना कोणत्या जातीच्या नावावर, ना कोणत्या धर्माच्या नावावर आणि ना कोणत्या देशाच्या नावावर हा प्रकाशाचा पुंजका झाकता येणार नाही. बाबासाहेब हे उच्च शिक्षण घेतलेले महापुरुष होते. त्यांनी आपली प्रतिभा, बुद्धी, प्रज्ञा आणि करुणाच्या बळावर समाजातील बदल घडवून आणले आहेत, असं सत्यार्थी यांनी म्हटलंय.
