पालकांना कोरोनाची धास्ती; नागपुरात 1250 शाळांपैकी अवघ्या 141 शाळा सुरु

| Updated on: Jul 19, 2021 | 10:25 PM

ग्रामीण भागांतील पालकांना आपल्या मुलांच्या सुरक्षेची काळजी सतावत असल्यामुळे जिल्ह्यातील 1250 शाळांपैकी अवघ्या 141 शाळा सध्या सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे.

पालकांना कोरोनाची धास्ती; नागपुरात 1250 शाळांपैकी अवघ्या 141 शाळा सुरु
पालकांना कोरोनाची धास्ती; नागपुरात 1250 शाळांपैकी अवघ्या 141 शाळा सुरु
Follow us on

नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना आहे, अशी भीती याआधी वेळोवेळी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी कोरोनाचा संसर्ग दर कमी झाला असला तरी पालकांमध्ये विषाणूचे भय कमी झालेले नाही. ग्रामीण भागात शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी बऱ्याच शाळांची घंटा अजून वाजलेलीच नाही. नागपूरच्या ग्रामीण भागात ही वस्तुस्थिती आहे. ग्रामीण भागांतील पालकांना आपल्या मुलांच्या सुरक्षेची काळजी सतावत असल्यामुळे जिल्ह्यातील 1250 शाळांपैकी अवघ्या 141 शाळा सध्या सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. ‘कोरोनाचे भय इथले संपत नाही’ असे चित्र सध्या नागपूरच्या ग्रामीण भागात आहे. (Corona’s intimidation to parents; Out of 1250 schools in Nagpur, only 141 schools started)

जिल्हा परिषदेचे प्रयत्न कुचकामी

राज्य सरकारच्या निर्णयानंतर कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करीत शाळा पुन्हा सुरु करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पावले उचलली आहेत. पुरेशी खबरदारी घेतल्यास आपण कोरोनाला हरवू शकू आणि संसर्गाचा धोकाही टाळू शकतो, अशी जनजागृती करून जिल्हा परिषदेमार्फत शाळा पुन्हा सुरु करण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मात्र कोरोना विषाणूविषयी पालकांच्या मनात भीती कायम असल्यामुळे बरेच पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास तयार झालेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल 1100 पेक्षा अधिक शाळा अजून सुरु झालेल्या नाहीत. विशेष म्हणजे अनेक सरपंचांनीही शाळा सुरु करण्यासाठी आपली एनओसी दिली नसल्याची माहिती प्रकाशझोतात आली आहे.

सरपंचांच्या एनओसीशिवाय शाळा सुरु करण्यास परवानगी नाही

राज्यात शिक्षण विभागाच्या आदेशाने कोरोनामुक्त भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. पण नागपूर जिल्ह्यातील पालकांमध्ये कोरोनाची भिती कायम आहे. त्यामुळे नागपूर जिल्हा परिषदेच्या आठवी ते बारावीच्या 1250 पैकी आतापर्यंत केवळ 141 शाळा सुरु झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या 1100 पेक्षा जास्त शाळा अद्याप सुरु झाल्या नाहीत. नव्या नियमावलीनुसार गावातील सरपंचांनी एनओसी अर्थात त्यांचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिल्याशिवाय शाळा सुरु करण्यास परवानगी दिली जात नाही.

दुसऱ्या लाटेत भयावह स्थिती, मात्र आता परिस्थिती नियंत्रणात

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी नागपूर जिल्ह्यात भयावह स्थिती होती. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली होती. मात्र आता ग्रामीण भागामध्ये कोरोना नियंत्रणात आला आहे. असे असताना इतर ठिकाणची परिस्थिती पाहून पालकांच्या मनात अजून कोरोनाविषयी भिती आहे. त्यामुळेच नागपूर जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा अद्याप सुरु झालेल्या नाही, असे जिल्हा परिषदेतील शिक्षण अधिकारी चिंतापण वंजारी यांनी सांगितले. (Corona’s intimidation to parents; Out of 1250 schools in Nagpur, only 141 schools started)

इतर बातम्या

मोठी बातमी ! पंढरपुरात अखेर 300 वारकऱ्यांना परवानगी, विसाव्यापासून मठापर्यंत मानाच्या पालख्या पायी जाणार

दिलासादायक! राज्यात आज 6,017 नव्या रुग्णांची नोंद, 66 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू