तुमचा नरेंद्र दाभोळकर करू, श्याम मानव यांना धमकी, बागेश्वर बाबांच्या भक्तांचा कारनामा?

| Updated on: Jan 23, 2023 | 3:07 PM

श्याम मानव यांच्या नागपूर येथील घराची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

तुमचा नरेंद्र दाभोळकर करू, श्याम मानव यांना धमकी, बागेश्वर बाबांच्या भक्तांचा कारनामा?
Image Credit source: social media
Follow us on

गजानन उमाटे,  नागपूरः अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव (Shyam Manav) यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. तुमचा नरेंद्र दाभोळकर (Narendra Dabholkar) करू, अशी धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) उर्फ धीरेंद्र महाराजांच्या भक्तांनीच ही धमकी दिल्याचं म्हटलं जातंय. एकानंतर एक चमत्कारांचा दावा करणाऱ्या बागेश्वर बाबांना अंनिसच्या वतीने आव्हान देण्यात आलं होतं. त्यामुळेच श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे श्याम मानव यांच्या रवि भवन येथील सरकारी निवासाला सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

मुलाच्या मोबाइलवर धमकीचे मेसेज

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य आणि श्याम मानव यांच्या मुलाच्या मोबाइलवर धमकीचे संदेश आल्याची माहिती उघड झाली आहे. अंनिसचे नेते हरिश देशमुख यांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली आहे. उद्या दुपारपर्यंत तुमची गोळी घालून हत्या करण्यात येईल, तुम्ही शांत बसा, अशा आशयाचे संदेश कार्यकर्त्यांच्या मोबाइलवर आले आहेत.

काय आहे प्रकरण?

लोकांच्या मनातलं ओळखण्याची तसंच अनोळखी व्यक्तीविषयी माहिती सांगण्याची दिव्यदृष्टी आपल्याकडे असल्याचा दावा करणाऱ्या बागेश्वर बाबा यांना श्याम मानव यांनी आव्हान दिलं आहे. बागेश्वर बाबा उर्फी धीरेंद्र महाराज नागपुरात आले असताना श्याम मानव यांनी त्यांना चॅलेंज दिलं होतं. दिव्य शक्ती सिद्ध करून दाखवल्यास त्यांना ३० लाखांचं बक्षीस देऊ, असं ते म्हणाले होते. तसेच महाराष्ट्रातील जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार, बागेश्वर बाबांविरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो, असा इशाराही श्याम मानव यांनी दिला होता. त्यानंतर बाबांच्या भक्तांनी श्याम मानव यांना धमकीचे मेसेज केले असतील, असा अंदाज वर्तवण्यात येतोय.

श्माम मानव यांच्या घराची सुरक्षा वाढवली..

दरम्यान, श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर याविषयी पोलिसात रितसर तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर श्याम मानव यांच्या नागपूर येथील घराची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

श्याम मानव यांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र स्पेशल प्रोकेट्शन युनिटसोबत आधी २ जवान तैनात असायचे. आता त्यात आणखी दोन बंदूकधारी तसेच ३ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश झाला आहे.