मोठी बातमी ! मुंबई, पुणे, नागपूरमधील स्विमिंग पूल तातडीने बंद करा, दुष्काळामुळे आणीबाणी; कुणी केली मागणी?
राज्यात भीषण दुष्काळामुळे पाणी टंचाई गंभीर झाली आहे. कृषी अर्थतज्ज्ञ विजय जावंधिया यांनी मुंबई, पुणे, नागपूरमधील स्विमिंग पूल, कार वॉशिंग तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. त्यांनी शहरांमधील पाण्याची उधळपट्टी थांबवून समान पाणी वाटप, ग्रामीण विहिरींचे पाणी संरक्षित करणे आणि दुष्काळग्रस्तांना भरीव मदत देण्याची सूचना केली आहे.

राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील अर्ध्याहून अधिक गावात पाणी टंचाई आहे. येत्या काळात ही पाणी टंचाई अधिक वाढण्याची शक्यता आहे. माणसांसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न उभा ठाकणार आहे. राज्यात सध्या आणीबाणीची परिस्थिती आहे. त्यामुळे मुंबई, पुणे आणि नागपूरसारख्या बड्या शहरातील स्विमिंग पूल तात्काळ बंद करण्याची मागणी होत आहे. कृषी अर्थतज्ज्ञ विजय जावंधिया यांनी ही मागणी केली आहे.
कृषी अर्थतज्ज्ञ विजय जावंधिया यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दुष्काळामुळे आणीबाणीची परिस्थिती आहे. त्यामुळे नागपूर, मुंबई, पुण्यासह सर्व शहरांतील सर्व स्विमिंग पूल ताबडतोब बंद करण्यात यावेत. कार वॉशिंग बंद करण्यात यावे, शहरांमधील पाण्याची उधळपट्टी थांबवावी, अशी मागणी विजय जावंधिया यांनी केली आहे.
पाण्याचं समान वाटप
यावेळी विजय जावंधिया यांनी पाण्याचं समान वाटप करण्याचंही सरकारला सूचवलं आहे. शहरात प्रति व्यक्ती 60 लीटर आणि ग्रामीण भागात प्रति व्यक्ती 40 लीटर पाणी वाटप करण्यात यावं. म्हणजे शहरातील पाण्याची उधळपट्टी थांबेल. यंदाचा दुष्काळ 1972 च्या दुष्काळापेक्षाही भयानक आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी आताच उपययोजना केल्या पाहिजे, असं जावंधिया यांनी म्हटलंय.
विहिरींचं पाणी संरक्षित करा
ग्रामीण भागातील विहिरीमधील पाणी पिण्यासाठी संरक्षित करण्यात यावे. दुष्काळाच्या जीआरमध्ये मदतीची मर्यादा 4 हेक्टर करावी, प्रत्येकाला हेक्टरी 20 हजार मदत द्यावी. मुख्यमंत्री बांधावर जात आहेत. आनंद आहे. पण शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी मदत करा, अशी मागणीही त्यांनी केली.
रब्बीसाठी आग्रह करु नये, पाणी पिण्यासाठी संरक्षित करणं महत्त्वाचं आहे. दुष्काळामुळे सोयाबीनचं मोठं नुकसान झालं आहे. ठेक्यावर जमीन घेणाऱ्यांचा अर्धा ठेका माफ करण्यात यावा. सरकारने अर्धा ठेका भरावा, असंही ते म्हणाले.
दुष्काळ जाहीर
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात दुष्काळ जाहीर केला आहे. राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. म्हणजे राज्यात 75 टक्के दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळ जाहीर करताना मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ निवारणासाठी उपाययोजनाही जाहीर केल्या आहेत.