मध्यरात्री भरधाव कार चिरडून गेली… प्रसिद्ध युवा डॉक्टर खुशी मूंदडा यांचं अपघातात निधन; आज नागपुरात अंत्यसंस्कार

सांगलीत कर्तव्य बजावून परतणाऱ्या डॉ. खुशी मुंधडा यांचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. भरधाव कारने धडक दिल्याने हा दुर्दैवी प्रसंग घडला. दुसरीकडे, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक बोगद्यातही फॉर्च्युनर आणि टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात एकाचा जीव गेला. या घटनांनी राज्यातील रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे.

मध्यरात्री भरधाव कार चिरडून गेली... प्रसिद्ध युवा डॉक्टर खुशी मूंदडा यांचं अपघातात निधन; आज नागपुरात अंत्यसंस्कार
नागपूरच्या डॉ. खुशीचा दुर्दैवी मृत्यू
| Updated on: Aug 07, 2026 | 11:19 AM

डॉक्टर हे दुसऱ्यांना जीवनदान देतात, त्यांना देवाचं दुसरं रूप मानलं जातं. मात्र सांगलीत झालेल्या भीषण अपघातात एका डॉक्टरलाच जीव गमवावा लागला. डॉ. खुशी पवन मुंधडा असं मृत डॉक्टरचं नाव असून त्या नागपूरच्या रहिवासी होत्या. सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कनिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. खुशी (वय २४, मूळ रा. शिवाजीनगर, नागपूर) यांचा भरधाव कारच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे मोठी खळबळ माजली असून डॉ. खुशी यांच्या जाण्यांमुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. डॉ. खुशी यांनी एमबीबीएसनंतर सांगलीतील भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयात एमएस शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या. त्यांचे सहकारी तर मोठ्या धक्क्यात आहे.

ड्युटीवरून घरी परत जातानाच काळाने गाठलं 

मिळालेल्या माहितीनुसार, खुशी या कामासाठी सांगलीत रहायच्या मात्र, नागपुरात सेवा सुरू करण्याच त्यांचं स्वप्न होतं. या दुर्दैवी अपघाताच्या रात्री,  ड्युटी संपल्यानंतर , काम आटोपल्यानंतर डॉ. खुशी या, त्यांचे सहकारी डॉक्टर डॉ. योगेश संतोष लढ्ढा (वय २७, मूळ रा. वाशिम) यांच्यासोबत मोपेडवरून बाहेर पडल्या होत्या. त्या त्याच्या घराच्या दिशेने जात होत्या, मात्र चुकीच्या दिशेने भरधाव वेगाने आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात डॉ. खुशी गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या सहकारी डॉक्टरने, इतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने,  त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

शवविच्छेदनानंतर खुशी यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला असून, आज नागपुरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या जाण्याने एक हसतखेळत कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झालं.

मिसिंग लिंक बोगद्यात भरधाव कारचा अपघात, एकाने गमावला जीव, 1 जखमी

तर दुसरीकडे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक बोगद्यात भरधाव फॉर्च्युनर कारने मालवाहू टेम्पोला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात तुषार भूमकर (रा. पिंपरी-चिंचवड) यांचा मृत्यू झाला असून, एक जण जखमी झाला आहे. तर अन्य तिघे सुखरूप बचावले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, फॉर्च्युनरमधील पाचही प्रवासी पिंपरी-चिंचवडमधील वाकड परिसरातील भूमकर चौक येथील रहिवासी आहेत. हे सर्वजण पुण्याहून मुंबईकडे जात असताना मिसिंग लिंक बोगद्यात हा अपघात झाला. या अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक सुमारे दोन तास मिसिंग लिंकमार्गे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे वाहने जुन्या मार्गाने वळविण्यात आली. अपघातग्रस्त वाहने महामार्गावरून हटवल्यानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us