विरोधकांनी आरोप केले अन् भाजपच्या मंत्र्याने थेट कोऱ्या कागदावर सही केली; म्हणाले हा घ्या राजीनामा!

| Updated on: Dec 20, 2023 | 3:45 PM

Winter Session 2024 : विरोधकांनी आरोप केले अन् भाजप नेत्यानं थेट राजीनाम्याचं पत्र काढलं... कोऱ्या कागदावर सही करत राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर सभागृहात चर्चा रंगली. सभागृहात नेमकं काय घडलं? आरोपांनंतर राजीनाम्याची तयारी दाखवणारे हे मंत्री नेमकं कोण? वाचा...

विरोधकांनी आरोप केले अन् भाजपच्या मंत्र्याने थेट कोऱ्या कागदावर सही केली; म्हणाले हा घ्या राजीनामा!
Follow us on

विनायक डावरूंग, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, नागपूर | 20 डिसेंबर 2023 : विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच विरोधकांकडून सत्ताधारी पक्षांवर आणि विशेष करून युती सरकारमधील मंत्र्यांवर आरोप केले जात आहेत. असेच आरोप भाजपच्या मंत्र्यावर आरोप केले गेले. पण या मंत्र्याने थेट राजीनाम्याची तयारी दाखवली आहे. हे मंत्री आहेत भाजपचे वरिष्ठ नेते, राज्याचे कौशल्य, रोजगार उद्योगता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा… विधानपरिषदेचे विरोधी मंगलप्रभात लोढा यांच्यावर आरोप केले अन् लोढा यांनी तडकाफडकी राजीनामा देण्याची तयारी दाखवली.

नेमकं काय घडलं?

विधान परिषदेत बोलत असताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाषणात मंगलप्रभात लोढा यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केले. त्यानंतर मंत्री मंगलप्रभात लोढा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मंगलप्रभात लोढा यांनी सभागृहात थेट कोऱ्या कागदावर सही केल्या अन् राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. आपण कोणत्याही प्रकारचे चुकीचे काम करत नसल्याचं लोढा यांनी यावेळी सांगितलं. तसंच जर आरोप करायचे असतील तर पुरावे सादर करा, असं जाहीर आव्हान लोढा यांवी दानवेंना दिलं.

मंगलप्रभात लोढा नेमकं काय म्हणाले?

अंबादास दानवे यांनी केलेले सर्व आरोप मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी फेटाळले आहेत. मी 10 वर्षांपासून मी माझ्या कुटुंबाच्या व्यवसायात नाही. जर माझ्या कुटुंबियांकडून अवैध व्यवसाय होत असेल तर मी कोऱ्या चिठ्ठीवर राजीनामा लिहून आणला आहे. एकही अनधिकृत बांधकाम केलेलं नाही. आम्ही अधिकृत व्यवसाय करत नाही. मी माझ्या पदाचा कधीही गैरवापर करत नाही, असं मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलं आहे.

दानवे काय म्हणाले?

अंबादास दानवे यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर भ्रष्टााराचे आरोप केले. त्यांची तयारी असेल तर मी पुरावे द्यायला तयार आहे. माझ्याकडे तक्रारी आल्या. त्यानंतर त्या मी मांडल्या आहेत, असं दावने म्हणालेत.

नीलम गोऱ्हे म्हणाल्या…

अंबादास दानवे यांचे आरोप आणि मंगलप्रभात लोढा यांच्या राजीनाम्यावर विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीही भाष्य केलं. आमदार खिशात राजीनामा घेऊन फिरतात मात्र कुणीच राजीनामा देत नाही. मात्र कुणी तो राजीनामा बाहेर काढत नाही. पण लोढासाहेब तुम्ही राजीनामा बाहेर काढलात. तुम्ही राजीनामा देवू नका. दानवेजी, तुम्ही संबंधित यंत्रणेकडे तक्रार करा, असं गोऱ्हे म्हणाल्या.