
Nitin Gadkari on Anjali Damania : इथेनॉल मिश्रीत पेट्रोल,डिझेल असो वा देशभरात मोठ मोठ्या रस्त्यांचे जाळे, टोल नाके, त्यांचे उद्योगविश्व यांचा संबंध जोडत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात टीकेची झोड उठवण्यात आली आहे. रस्ते, टोलनाके यामध्यमातून गडकरींवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केले आहेत. तर सोशल मीडियावर सुद्धा याविषयीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. वातावरण तापलेले असतानाच गडकरी यांनी विरोधकांना शिंगावर घेतले आहे. आपल्याविरोधात जाणीवपूर्वक मोहीम सुरु असल्याचा आरोप गडकरींनी केला आहे. त्यांनी नागपूरमधील सभेत यामागे कोण आहेत, त्याचे नावच घेतले आहे.
माझ्याविरोधात पेड न्यूज
नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे उड्डाणपुलाच्या उद्धघाटन कार्यक्रमात त्यांनी विरोधकांना धुतले. त्यांच्यावरील आरोपांचा समाचार घेतला. इथेनॉलच्या वादावर बोलताना, त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला. प्रदूषण कमी झाले. इंधनाची आयात घटली. त्यामुळे देशाचे 22 लाख कोटी रुपये वाचले. यामुळे अनेकांचा धंदा बसला. ते माझ्यावर नाराज झाले आणि त्यांनी माझ्याविरुद्ध पेड न्यूज सुरु केल्या असा आरोप गडकरींनी केला.
शेतकरी इंधनदाता, ऊर्जादाता झाला पाहिजे, यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे. शेतमालापासून इथेनॉल तयार करण्याचे काम केले जात आहे. माझी इनोव्हा कार याच इथेनॉलवर धावते. आज आपल्या देशात मोठ्या प्रमाणात इथेनॉलची निर्मिती होत आहे. त्याचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा होत आहे. पण काही लोकांचा धंदा बसला आहे. त्यामुळे ते माझ्यावर नाराज झाले आहेत, असे गडकरी म्हणाले.
एक रुपया पण घेतला नाही
राजकारण हा ईर्ष्या, मत्सर, अहंकार, द्वेषाचा खेळ आहे. आपली रेषा मोठ्या करण्याऐवजी दुसऱ्याची पुसल्यास आपली मोठी होईल अशी अपेक्षा काहींची आहे, त्यामुळे ही माणसं टीका करतात. मी एकाही कंत्राटदाराकडून आतापर्यंत एकही रुपया घेतला नाही. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर घाबरतात. मी खोटी कामं केली नाहीत. कोणी कितीही आरोप केले तरी मी विचलीत होणार नाही. तुम्हीही होऊ नका, असे गडकरी म्हणाले.