Nitin Gadkari | नितीन गडकरींनी टोचले साहित्यिकांचे कान; म्हणाले, साहित्यातून प्रेरणा घेऊन काम करणारेही राजकारणी

| Updated on: Jan 15, 2022 | 2:32 PM

राजकारण, समाजकारणासह प्रत्येक क्षेत्राचा संबंध साहित्यिकाशी आहे. प्रत्येकाने मर्यादा, जबाबदारी आणि कर्तव्याच्या बाबतीत आपली लक्ष्मणरेषा ठरवणे आवश्यक आहे. ती ठरवण्याची वेळ आता आली आहे, असे गडकरींनी म्हणाले.

Nitin Gadkari | नितीन गडकरींनी टोचले साहित्यिकांचे कान; म्हणाले, साहित्यातून प्रेरणा घेऊन काम करणारेही राजकारणी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
Follow us on

नागपूर : साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारण्यांनी येऊ नये ही भूमिका योग्य नाही. साहित्यातून प्रेरणा घेऊन काम करणारे राजकारणी आणि समाजकारणीही आहेत, असे सांगतानाच एक दुसऱ्याशी आपला संबंधच असता कामा नये ही गोष्ट योग्य होणार नाही. अशा शब्दात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी साहित्यिकांचे कान टोचले. ते विदर्भ साहित्य संघ शताब्दी महोत्सव कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ऑनलाईन पद्धतीने काल बोलत होते. राजकारण, समाजकारणासह प्रत्येक क्षेत्राचा संबंध साहित्यिकाशी आहे. प्रत्येकाने मर्यादा, जबाबदारी आणि कर्तव्याच्या बाबतीत आपली लक्ष्मणरेषा ठरवणे आवश्यक आहे. ती ठरवण्याची वेळ आता आली आहे, असे गडकरींनी म्हणाले.

वि. सा. संघाचा 100 वर्षांचा इतिहास

विदर्भ साहित्य संघाचा 99 वा वर्धापनदिन महोत्सव शुक्रवारी साजरा करण्यात आला. या आभासी समारोहात गडकरी बोलत होते. वि. सा. संघाचा 100 वर्षांचा इतिहास विदर्भातील साहित्यिक चळवळीला दिशा देणारा आहे. ग. त्र्यं. माडखोलकर, राम शेवाळकर यांच्यासारख्या थोर साहित्यिकांनी वि. सा. संघाला अतिशय योग्य मार्गदर्शन केले. तसेच डॉ. मनोहर म्हैसाळकर यांनीही वि.सा. संघाचे यशस्वी नेतृत्व केले. साहित्य संघाची चळवळ ही विदर्भासाठी अभिमानाचा विषय असल्याचे गडकरी यांनी नमूद केले. प्राचार्य राम शेवाळकर यांचे एक स्मारक अंबाझरी रोडवर व्हावे, अशी इच्छा व्यक्त करताना गडकरी म्हणाले, या स्मारकासाठी नासुप्र जागा देऊन बांधून देण्यास तयार आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग करून साहित्यक्षेत्रातही आता बदल व्हावेत. साहित्याच्या मांडवात राजकारणी असू नये, ही भूमिका योग्य नाही, असेही गडकरी म्हणाले.

तरुणांना साहित्यिकांनी प्रभावित केले

नागपूरला झालेल्या साहित्य संमेलनाकरिता माझ्यासह सर्वच राजकारणी निधी संकलन करीत होते. त्यावेळी तत्कालीन अध्यक्षांनी संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारणी नकोत, असे वक्तव्य केले. तो त्यांचा अधिकार होता. पण चांगल्या साहित्यामुळे राजकारणात गुणात्मक परिवर्तन होते. भूतकाळातील साहित्य, इतिहास, संस्कृती वारसा घेऊन भावी पिढी निर्माण होणार आहे. चांगल्या साहित्यातून राजकारणालाही चांगली दिशा मिळू शकते हेही लक्षात घेतले पाहिजे, असे गडकरी म्हणाले. राजकारण, समाजकारण व तरूण पिढीला साहित्यिकांनी प्रभावित केले आहे. पिढी घडवण्यात साहित्य, संस्कृती, इतिहास व वारसा महत्त्वाचा असतो. त्यामुळे साहित्य संघाने आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करीत लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, असे ते म्हणाले.

ओबीसी आरक्षणाबाबत सोमवारी न्यायालयात सुनावणी; वडेट्टीवार म्हणतात, वेळ वाढवून देण्याची मागणी करणार, कारण काय?

Nagpur Crime | एफआयआर दाखल करणार नाही म्हणून मागितली लाच; रामटेकचा वनपाल कसा अडकला एसीबीच्या जाळ्यात?

Nagpur Corona | नागपुरात कोरोनाचे तीन बळी, चिंता वाढली; बाधितांमध्ये पोलिसांची संख्या किती?