
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या सडेतोड विधानाने राजकारणात वणवा पेटला आहे. शनिवारी नागपूरमध्ये एका कार्यक्रमात त्यांनी प्राचार्य आणि शिक्षकांशी संवाद साधला. त्यावेळी सत्ता, संपत्ती, पैसा, ज्ञान आणि सौंदर्य प्राप्त झाल्यावर लोक नेहमी अहंकारी होतात. ते गर्विष्ठ होतात, असे ते म्हणाले. ज्यावेळी लोकांच्या लक्षात येते की, ते सर्वात बुद्धिमान आहे. तेव्हा इतरांवर हक्क गाजवण्याची त्यांची इच्छा वाढते असे ते म्हणाले. मागितल्याने सन्मान मिळत नाही, असा खणखणीत टोला गडकरींनी हाणला. त्यांच्या भाषणाची जोरदार चर्चा सुरू आहे.
स्वत:ला लादून कोणी महान होऊ शकत नाही
स्वत:ला लादून कोणी महान होऊ शकत नाही, इतिहासात डोकावून पाहा. ज्यांना लोकांनी स्वीकारले आहे, त्यांना स्वत:ला लादण्याची गरज पडली नाही, अशी जोरदार फटकेबाजी त्यांनी केली. त्यांच्या वक्तव्याची सध्या चर्चा सुरू आहे. गडकरी यांनी नेत्यांच्या अहंकारी वृत्तीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. मी सर्वात बुद्धिमान आहे. मी साहेब झालो आहे, मी दुसर्याला गिनतच नाही, त्याला मोजत नाही, असा चिमटा ही त्यांनी अशा नेत्यांना काढला. त्यांनी सध्याची भीषण वास्तवताच जणू समोर आणली आहे.
सन्मान मागून मिळत नाही
या कार्यक्रमात त्यांनी, तुम्ही तुमच्या जवळील, तुमच्या हाता खालील, कनिष्ठांसोबत कसा व्यवहार करतात, त्यावर तुमचे खरे नेतृत्व गुण कळतात. सन्मान, गौरव हा मागून मिळत नाही. ते तुमच्या कर्मावरून मिळते, असे महत्त्वपूर्ण विधान गडकरी यांनी केले. गडकरी यांच्या विधानाने राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या या टिप्पणीवर विरोध पक्षांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नागपूरमधील शिक्षक भरती घोटाळ्यावर सुद्धा फटकेबाजी केली. अनेक शिक्षकांची नियुक्ती ही लाच देऊन करण्यात आल्याचे ते म्हणाले. या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना कानपिचक्या असल्याचा दावा माजी मंत्री नितीन राऊत यांनी केला. गडकरी यांचे सडेतोड वक्तव्य हे भाजपातंर्गत असलेला अहंकार आणि आत्मकेंद्रित वृत्तीवर थेट प्रहार असल्याचे ते म्हणाले.