भाजपची भूमिका आगीत तेल टाकून आग वाढवण्याची; राज्यातील हिंसेवरून पवारांचा हल्लाबोल

| Updated on: Nov 18, 2021 | 1:39 PM

त्रिपुरातील घटनेचे अमरावतीत पडसाद का उमटले? असा सवाल करतानाच भाजपची भूमिका आगीत तेल टाकून आग वाढवण्याची आहे.

भाजपची भूमिका आगीत तेल टाकून आग वाढवण्याची; राज्यातील हिंसेवरून पवारांचा हल्लाबोल
sharad pawar
Follow us on

नागपूर: त्रिपुरातील घटनेचे अमरावतीत पडसाद का उमटले? असा सवाल करतानाच भाजपची भूमिका आगीत तेल टाकून आग वाढवण्याची आहे, असा घणाघाती हल्ला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपवर चढवला.

नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी हा टोला लगावला. सध्या सांप्रदायिक विचार, जातीयवाद्यांना खतपाणी घालण्याचा प्रयत्न होतोय. जातीवादी विचार माणसामाणासात द्वेष निर्माण करत आहे. हा विचार राबवणाऱ्या शक्तिंना खड्यासारखं बाजूला ठेवणं आपलं कर्तव्य आहे. आदिवासी अशा शक्तींना कधीही बळी पडत नाही, असं पवारांनी सांगितलं. त्रिपुरातील घटनेचे अमरावतीत पडसाद का उमटले? असा सवाल त्यांनी केला. भाजपची भूमिका आगीत तेल टाकून आग वाढवण्याची आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

वनवासी शब्द अमान्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी संमेलनात वनवासी हा शब्द वापरला. त्यांच्या भाषणात आदिवासी हा शब्दच नव्हता. पण आदिवासी समाजाला वनवासी शब्द मान्य नाही, असा टोला त्यांनी मोदींना लगावला. आदिवासी हा जंगलाचं रक्षण करण्याचं काम करतोय. जल, जमीन, जंगलाचं रक्षण आदिवासी करत आहे. त्यामुळे आदिवासींकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला पाहिजे, असं पवारांनी सांगितलं.

शेतीवरचा भार अडीच पटीने वाढला

स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 80 टक्के लोक शेती करत होते. तेव्हा 35 कोटी लोक संख्या होती. आता 112 कोटी लोकसंख्या आणि 60 टक्के लोक शेती करत आहेत. म्हणजे शेतीवरचा लोकांचा भार अडीच पटीने वाढला आणि जमिनीवरचा कमी झाला. आपण विकासाची कार्यक्रम हाती घेतो. कोणताही कार्यक्रम हाती घ्यायचा असेल तर जमिनीची गरज असते. त्यामुळे शेतीचं प्रमाण कमी होत असून शेतकऱ्यांवर ताण येत आहे, असं त्यांनी सांगितलं. विकास कामात जमिनी हव्या असल्याने शेतीची जमीन उद्योगाला देण्यासाठी शेतकऱ्यांवर दबाव येत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

तर शेतकरी आंदोलन करू

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन निधी द्यावा. वेळप्रसंगी सरकारने कर्ज काढावं. पण शेतकऱ्यांना मदत करावी. शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने दिलासा द्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं. संसदेच्या आगामी अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू. जर संसदेत सत्ताधाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळालं नाही, तर देशभर शेतकरी आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला.

तर आत्राम यांनाच लोकसभेचं तिकीट देऊ

अहेरी विधानसभा मतदारसंघाची तिकीट धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांना देऊ असं सांगतानाच गडचिरोली लोकसभा जागा मिळाली तर धर्मरावबाबा आत्राम यांच्याशिवाय दुसरा उमेदवार नाही, असं त्यांनी जाहीर केलं.

 

संबंधित बातम्या:

निलंबनाच्या भीतीनं ST कर्मचाऱ्याकडून विष प्राशन, बुलडाण्याच्या विशाल अंबलकर यांचं अकोल्यात निधन

Nashik| ऐन निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजपकडून महापालिकेत 2632 पदांची नोकर भरती

झूठ बोले कौआ काटे, भाजपच्या काळात दंगली झाल्याच नाहीत, अनिल बोंडे खोटं बोलत असल्याचा मलिक यांचा आरोप