Talathi Exam : ‘या’ जिल्ह्यातही तलाठी भरती परीक्षा दीड तास उशिराने; आयुक्तांचं महत्त्वाचं निवेदन काय?

राज्यातील तलाठी परीक्षा भरती दरम्यान आज प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थ्यांचा चांगलाच खोळंबा झाला. राज्यभर हेच चित्रं होतं.

Talathi Exam : या जिल्ह्यातही तलाठी भरती परीक्षा दीड तास उशिराने; आयुक्तांचं महत्त्वाचं निवेदन काय?
Talathi Exam Server Down
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 21, 2023 | 1:54 PM

स्वप्नील उमप, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, अमरावती | 21 ऑगस्ट 2023 : राज्यातील तलाठी भरती परीक्षे दरम्यान आज अभूतपूर्व गोंधळ उडाला. परीक्षेआधीच सर्व्हर डाऊन झाल्याने राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राबाहेर ताटकळत उभं राहावं लागलं. ऐन सकाळीच हा गोंधळ उडाला. दीड दोन तास विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राबाहेर उभं राहावं लागल्याने विद्यार्थ्यांच्या संतापाचा कडेलोट झाला. त्यानंतर मीडिया परीक्षा केंद्रावर दाखल होताच प्रशासनाने खडबडून कारवाई करण्यास सुरुवात केली. नव्याने परीक्षेची वेळ जाहीर केली. पण अमरावती जिल्ह्यातही दीड तासाने परीक्षा उशिराने सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे.

अमरावती जिल्ह्यातही सर्व्हर डाऊन असल्यामुळे तलाठी परीक्षा दीड तास उशिराने सुरू होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा 2 ते 4 या वेळे दरम्यान होणार आहे. तर पहिल्या टप्प्यातील 10.30 ते 12.30 दरम्यानची परीक्षा पार पडली आहे. निवडीचे केंद्र न मिळाल्याने मिळालेल्या केंद्रावर विद्यार्थी दाखल झाले आहेत. अमरावतीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी दाखल झाले आहेत. परीक्षाच वेळापत्रक चेंज झाल्याने विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण तीन टप्प्यात 8 केंद्रावर 2004 विद्यार्थी परीक्षा देत आहे.

आयुक्तांचं निवेदन जसंच्या तसं

जाहीर निवेदन

तलाठी भरती परीक्षा २०२३ दिनांक २१/०८/२०२३ रोजी राज्यातील ३० जिल्हे व ११५ टीसीएस केंद्रावरती नियोजीत करणेत आली होती. सदर परिक्षेच्या वेळापत्रकानुसार सकाळी पहिले सत्र ९.०० ते ११.०० नियोजीत करणेत आले होते. तथापी टीसीएस कंपनीच्या डेटा सेंटर सर्व्हर मध्ये तांत्रिक बिघाड झालेने सदरचे सत्र वेळेनुसार सुरु करणेस अडचण निर्माण झाली. यासंदर्भात टीसीएस कंपनीकडून राज्य समन्वय कार्यालयास परिक्षा उशीरा सुरु होणेबाबत कळविण्यात आले.

टीसीएस कंपनी व त्यांचे डेटा सेंटर यांनी सर्व देशभरातील परिक्षासंदर्भातील हा तांत्रिक बिघाड झाला असल्याने वरिष्ठ वैज्ञानिक यांच्या स्तरावर याबाबत युध्द पातळीवर हा तांत्रिक बिघाड शोधून परिक्षा ११.०० वाजता सर्व केंद्रवार सुरु करणेबाबत कळविणेत आले. राज्य समन्वयक यांनी सर्व निवासी उप जिल्हाधिकारी यांचेशी संपर्क करुन प्रथम सत्रातील विद्यार्थ्याना नियोजीत परिक्षा उशीरा सुरु होईल असे कळविणेत आले. त्याप्रमाणे सर्व परिक्षाकेंद्रांवरील परिक्षार्थीना याची सुचना देण्यात आली.

टीसीएस कंपनीकडून तांत्रिक बिघाड दूर करणेत येवून राज्यातील सर्व ११५ केंद्रावर परिक्षा सुरु करणेबाबत सुचना मिळाल्यानंतर सर्व परिक्षा केंद्रातील अधिकाऱ्यांना याबाबत सुचित करणेत येवून परिक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला असून राज्यातील सर्व ११५ केंद्रावर ११.०० वाजता परिक्षा सुरु करणेत आली आहे.

राज्यातील सर्व तलाठी भरतीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना टीसीएस कंपनीच्या तांत्रिक बिघाडामुळे आज होणाऱ्या तीनही सत्रातील परिक्षा नियोजीत वेळेपेक्षा दोन तास उशिरा सुरु होतील. त्याप्रमाणे बदलेल्या वेळेबाबत सर्व परिक्षा केंद्रावर सुचना प्रसारित करणेची कार्यवाही निवासी उपजिल्हाधिकारी यांचे मार्फत परिक्षा केंद्राना देण्यात येत आहे. तरी सर्व परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी महसूल प्रशासन / पोलीस प्रशासन तसेच टीसीएस कर्मचारी यांना सहकार्य करावे ही विनंती. सर्व परिक्षार्थीना नियोजीत दोन तासांचा वेळ परिक्षेसाठी देण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे दिव्यांग परिक्षार्थी यांना आजचे सत्र दोन मध्ये अतिरिक्त देय असणारा वेळ देण्यात येणार आहे. आपणास या निवेदनाद्वारे आज टीसीएस कंपनी व त्यांचे डेटा सेंटर यांचे कडून तांत्रिक बिघाडामुळे झालेल्या दिरंगाई व मनस्तापाबद्दल शासनाच्या वतीने राज्य समन्वयक तलाठी भरती परिक्षा २०२३, यानिवेदनाद्वारे दिलगीरी व्यक्त करीत आहे. कृपया सर्वांनी सहकार्य करावे ही नम्र विनंती.

आपला विश्वासू

(आनंद रायते) भा.प्र.से.

राज्य परिक्षा समन्वयक तलाठी भरती परिक्षा २०२३ जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख पुणे