Special Report : अधिवेशनाचा दिवस घोषणाबाजीनं गाजला, ग्रामपंचायत निवडणुकीवरून दावे-प्रतिदावे काय?

| Updated on: Dec 21, 2022 | 11:11 PM

ग्रामपंचायतींच्या निवडणुका पक्षीय चिन्हावर होत नाही. मात्र आमचंच पॅनल असल्याचा दावा करत, आपआपले आकडे सांगणं सुरु आहे.

Special Report : अधिवेशनाचा दिवस घोषणाबाजीनं गाजला, ग्रामपंचायत निवडणुकीवरून दावे-प्रतिदावे काय?
Follow us on

नागपूर :  अधिवेशनाचा आजचा दिवस सत्ताधारी आणि विरोधकांच्या घोषणाबाजीनं गाजला. विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिवाय ग्रामपंचायत निवडणुकीवरुनही वेगवेगळे दावे केले. मंगळवारनंतर बुधवारीही विरोधकांच्या घोषणाबाजीला सत्ताधाऱ्यांनीही घोषणा देऊनच, प्रत्युत्तर दिलं. नागपुरातील NITच्या भूखंडावरुन विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी घोषणा दिल्या. भूखंडाचा श्रीखंड, घेतले खोके भूखंड ओके, खोके सरकार हाय हायच्या घोषणांनी विधानभवनाचा परिसरात विरोधकांनी दणाणून सोडला. भूखंडाचा श्रीखंड असे मजकूर लिहिलेले पोस्टर घेऊन विरोधकांनी शिंदेंच्या विरोधात घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे घोषणाबाजीसाठी महाविकास आघाडीचे सर्वच बडे नेते आघाडीवर होते.

अजित पवार,  अशोक चव्हाण,  नाना पटोले, जितेंद्र आव्हाड आणि आदित्य ठाकरेंकडूनही घोषणा सुरु होत्या. विरोधक मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक आहेत. पण स्वत: मुख्यमंत्र्यांनी भूखंड वाटपात कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचं म्हटलं. मात्र तरीही विरोधकांची आंदोलनं आणि घोषणा सुरुच असल्यानं सत्ताधाऱ्यांनीही घोषणाबाजी केली. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचा विषय घेतला. तर सत्ताधाऱ्यांनी सुषमा अंधारे आणि संजय राऊतांच्या वक्तव्यावरुन मविआला घेरलं.

विठ्ठलाचे धरले नाही पाय, महाविकास आघाडीचे करावे काय ?, असे पोस्टर घेऊन भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनीही घोषणा दिल्या. वारकऱ्यांच्या वेशात आणि टाळ वाजवत शिंदे गट आणि भाजपचे आमदार आक्रमक झाले. विरोधक आणि सत्ताधाऱ्यां व्यतिरिक्त आणखी एक वेगळं चित्र विधान भवनाच्या परिसरात दिसलं…विरोधी पक्षनेते अजित पवार आणि मविआच्या नेत्यांनी, ग्रामपंचायतीच्या निकालानंतर पेढे भरवत आनंद साजरा केला.

मंगळवारी, शिंदे आणि फडणवीसांनी हार घालत एकमेकांना पेढे भरवले होते…आणि फडणवीसांनी भाजप आणि शिंदे गटानं सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला होता..पण महाविकास आघाडीनं 7 हजार 751 पैकी 4 हजार 19 ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा अजित पवारांनी केलाय. ग्रामपंचायतींच्या निवडणुका पक्षीय चिन्हावर होत नाही. मात्र आमचंच पॅनल असल्याचा दावा करत, आपआपले आकडे सांगणं सुरु आहे.