Big breaking : मराठा समाजाला ओबीसींचं प्रमाणपत्र दिल्यास… ओबीसी महासंघ आक्रमक; काय दिला इशारा?

| Updated on: Sep 06, 2023 | 12:10 PM

आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा आणि ओबीसींमध्ये संघर्ष उडण्याची शक्यता आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी होऊ लागली आहे. त्याला ओबीसी समाजातून तीव्र विरोध होत आहे. त्यामुळे आरक्षणाचा संघर्ष अधिकच चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Big breaking : मराठा समाजाला ओबीसींचं प्रमाणपत्र दिल्यास... ओबीसी महासंघ आक्रमक; काय दिला इशारा?
baban taywade
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नागपूर | 6 सप्टेंबर 2023 : आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे पाटील हे गेल्या नऊ दिवसांपासून आरक्षणासाठी जालन्यात उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृतीही बिघडली आहे. तसेच मराठा आंदोलकांनी राज्यभर निदर्शने सुरू केल्याने राज्य सरकारने आरक्षणासाठी हालचील सुरू केल्या आहेत. तर, दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीत सामावून घेण्याची मागणी पुढे येत आहे. त्याला अनेक नेत्यांनी विरोध केला आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघानेही या मागणीला कडाडून विरोध केला आहे. तसेच या मुद्द्यावरून रान पेटवण्याचा इशाराही त्यांनी दिला.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी मराठ्यांना ओबीसींमध्ये घेण्यास तीव्र विरोध केला आहे. आमचा मराठा समाजाला ओबीसीत घेण्यास विरोध आहे. त्यांना ओबीसींमध्ये घेऊ नये. तसेच त्यांना ओबीसींची प्रमाणपत्रेही देऊ नये. नाही तर आम्ही देशभर आंदोलन छेडू, असा इशारा बबनराव तायवाडे यांनी दिला आहे. ते मीडियाशी बोलत होते.

तर कोर्टात जाऊ

जरांगे पाटील यांच्या दबावात येऊन निर्णय घेतल्यास आम्ही आंदोलन करू. सरकारने दबावात येऊन मराठ्यांना ओबीसींचं प्रमाणपत्र दिल्यास आम्ही न्यायालयात जाऊ. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं, ओबीसीतून आरक्षण देऊ देणार नाही, असा इशाराच बबनराव तायवाडे यांनी सरकारला दिला आहे.

अहवाल देणार

दरम्यान, राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना आणि जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आज सकाळी जालन्यात जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली. या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी जरांगे पाटील यांची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी चौकीशीचे आदेश दिले होते म्हणून अंतरावली सराटी गावात आलो आहे. मनोज जरांगे यांची भेट घेतली. या चौकशीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार आहोत, असं अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांनी सांगितलं.

जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली

जरांगे पाटील यांचा आज उपोषणाचा नववा दिवस आहे. त्यांची प्रकृती आज खालावली आहे. जरांगे पाटील यांना सकाळीच सलाईन लावण्यात आली. एक वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल आहे. जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्याचं वृत्त येताच त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते अंतरावली सराटीकडे येताना दिसत आहेत. राज्य सरकारने युद्धपातळीवर आरक्षणाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी यावेळी केली जात आहे.