
तंत्र-मंत्र आणि अघोरी विद्येच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणारा भोंदू अशोक खरात हा राज्यात चर्चेचा विषय आहे. याच मुद्द्याला घेऊन राज्यात राजकारण पेटले आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे कृत्य करून त्याने अनेक गंभीर कांड केले आहेत. दरम्यान, एकीकडे अशोक खरातचे नवनवे कारनामे समोर येत असताना आता दुसरीकडे नांदेड जिल्ह्यातील किनवट तहसील कार्यालय चर्चेत आले आहे. या तहसील कार्यालयाच्या एका दरवाजाबाबत अनेक चर्चा रंगल्या आहेत. त्या भागातील लोक या दरवाजाबाबत एक गंभीर दावा करत असून प्रशासन मात्र वेगळंच काहीतरी सांगत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातील किनवट तहसील कार्यालयातील एक दरवाजा नेहमीच बंद असतो. याच दरवाजामुळे आता मोठा वाद निर्माण झाला आहे. स्थानिक लोक तसेच शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या दाव्यानुसार तहसील कार्यालयाची इमारत जेव्हापासून तयार झालेली आहे, तेव्हापासून हा दरवाजा अंधश्रद्धेमुळे बंदच ठेवण्यात आला आहे. तहसील कार्यालयातील हा पश्चिमेकडील दरावाजा आहे.
शेतकरी संघटनेचे पदाधिकारी रमेश कदम यांनी या दरवाजाबाबत सविस्तर सांगितले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार काही वर्षांपर्वी किनवट तहसील कार्यालयाची इमारत बांधण्यात आली होती. परंतु ही इमारत जेव्हापासून उभारण्यात आली, तेव्हापासून पश्चिमी भागातील हा दरवाजा बंदच आहे. कदम यांच्या दाव्यानुसार अंधश्रद्धेमुळेच हा दरवाजा बंद आहे. एका अधिकाऱ्याने हा दरवाजा बंद ठेवण्यााच आदेश दिलेला आहे. परंतु या आदेशामुळे लोकांची खूपच अडचण होत आहे. तहसील कार्यालयात दाखल व्हायचे असल्यास पूर्वेकडील दरवाजातून जावे लागते. त्यासाठी लोकांना लोकांना बरेच अंतर पायी चालावे लागते, असे रमेश कदम यांनी सांगितले.
दुसरीकडे नांदेड जिल्हा प्रशासनाने अंधश्रद्धेचा आरोप फेटाळून लावला आहे. पश्चिमेतील दरवाजा हा इमारताचे मुख्य प्रवेशद्वार नाही. जो दरवाजा बंद आहे, त्याच्या बाजूलाच महिलांसाठीचे प्रसाधनगृह आहे. त्यामुळे महिलांची सुरक्षा लक्षात घेऊन आम्ही तो दरवाजा बंद ठेवला आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले.